मुरूम वाहतुक करणार्‍यांची मुजोरी; LCB च्या पोलीस अंमलदाराला मारहाण

दोघे अटकेत, अल्पवयीन ताब्यात
मुरूम वाहतुक करणार्‍यांची मुजोरी; LCB च्या पोलीस अंमलदाराला मारहाण

अहमदनगर (प्रतिनिधी)

मुरूम वाहतुक करणार्‍या डंपरच्या मालकाने बंदोबस्तावर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विजयकुमार वेठेकर यांना मारहाण केली.

गुरूवारी रात्री शहरातील चितळे रोडवर ही घटना घडली. या प्रकरणी अंमलदार वेठेकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

डंपरचा मालक अरूण भानुदास ढाकणे (वय 42), एक अल्पवयीन मुलगा (दोघे रा. गणेशनगर, नगर-कल्याण रोड) व डंपरचा चालक गणेश शेषराव नागरे (वय 21 रा. गाडगीळ पटांगण, नालेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अरूण ढाकणे व गणेश नागरे यांना अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

गुरूवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत शौर्य यात्रेनिमित्त स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बंदोबस्त होता. या बंदोबस्तदरम्यान पोलीस अंमलदार वेठेकर व बबन मखरे हे दुचाकीवरून गस्त घालत असताना चितळे रोडवर डंपर चालक नागरे याने अंमलदार मखरे यांना डंपरची धडक देऊन जखमी केेले.

दरम्यान त्यांच्या सोबत असलेले अंमलदार वेठेकर यांनी चालक नागरे याला पोलीस असल्याचे सांगून समजून सांगत असताना चालक नागरे व त्याच्यासोबत असलेला अल्पवयीन मुलाने शिवीगाळ, दमदाटी केली. त्यांनी डंपर मालक अरूण ढाकणे याला फोन करून बोलून घेतले. काही वेळात अरूण ढाकणे घटनास्थळी आला. त्याने अंमलदार वेठेकर यांना मारहाण करत ते करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिघांसह डंपरही ताब्यात घेतला आहे. पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com