पूर्वी स्वस्तात सोन्याचे तर आता गोडतेलाचे अमिष दाखवून लूट; तिघे जेरबंद

एलसीबी व नगर तालुका पोलिसांची संयुक्त कारवाई
पूर्वी स्वस्तात सोन्याचे तर आता गोडतेलाचे अमिष दाखवून लूट; तिघे जेरबंद

अहमदनगर|Ahmedagar

पूर्वी स्वस्तात सोने देण्याच्या अमिषाने लुट करणार्‍या टोळीने आता स्वस्तात गोडतेल देण्याचे अमिष दाखवून लुटीचा धंदा सुरू केला आहे.

अशाच एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व नगर तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जेरबंद केले. सोलापूरच्या एकाला नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात या टोळीने दोन दिवसापूर्वी स्वस्तात गोडतेलाचे डबे देण्याचे अमिष दाखवून बोलून घेत त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल असा 76 हजारांचा मुद्देमाल लुटला होता.

राहुल नेवाशा भोसले (वय 22), उरूस ज्ञानदेव चव्हाण (वय 33 दोघे रा. वाकळी ता. नगर), दगू बडोद भोसले (वय 27 रा. पढेगाव ता. कोपरगाव) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

आरोपींनी हर्षल शिवशंकर चौधरी (रा. अकलुज ता. माळशिरज जि. सोलापूर) यांना स्वस्तात गोडतेलाचे डबे देतो म्हणून घोसपुरी शिवारात बोलून घेतले होते. चौधरी यांनी स्वस्तात गोडतेल घेण्यासाठी सोबत पैसे आणले होते. फिर्यादी येताच आरोपींनी त्यांना दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत 60 हजाराची रक्कम व दोन मोबाईल बळजबरीने काढून घेतला होता. चौधरी यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी गुप्त खबर्‍यामार्फत आरोपींचा शोध घेऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केेली आहे. एलसीबीचे निरीक्षक अनिल कटके, सहायक निरीक्षक मिथून घुगे, नगर तालुक्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली.

दगू भोसले मोक्का गुन्ह्यात होता पसार

सराईत गुन्हेगार दगू भोसले याचाविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मोक्का लागल्यानंतर भोसले तीन वर्षापासून पसार होता. त्याच्याविरूद्ध कोपरगाव व संगमनेर पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत. याशिवाय उरूस चव्हाण, राहुल भोसले विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात प्रत्येकी तीन गुन्हे दाखल आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com