खोटे प्रतिज्ञापत्राचा वापर करून जमीन बळकावली

सख्ख्या भावाविरूध्द कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल
खोटे प्रतिज्ञापत्राचा वापर करून जमीन बळकावली

अहमदनगर (प्रतिनिधी)

वडिलांच्या मृत्यूनंतर खोटे प्रतिज्ञापत्र देऊन जमीन बळकावणार्‍यावर बनावट कागदपत्र तयार केल्याचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त कर्मचारी प्रभाकर गंगाधर भिंगारदिवे (वय 66, हल्ली रा. पोलीस वसाहत, शिवाजीनगर, पुणे, मूळ रा. माळीवाडा, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा सख्खा भाऊ पदमाकर गंगाधर भिंगारदिवे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रभाकर भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वडील गंगाधर रामभाऊ भिंगारदिवे यांना सहा मुले, एक बहिण अशी सात मुले होती. वडिलोपार्जित जमीन ही बुरूडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉनसमोर प्लॉट नंबर 200मध्ये 46.4 चौरस मीटर होती. त्यांचे 8 डिसेंबर 1974 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना वारसदार म्हणून आई अनुसया, सहा भाऊ आणि एक बहिण यांच्या नावाची नोंद लागणे आवश्यक होते.

पद्माकर भिंगारदिवे यांनी 8 डिसेंबर 2005 रोजी नगर भूमापन अधिकार्‍यांनी लेखी पत्र आणि प्रतिज्ञापत्र देऊन गंगाधर भिंगारदिवे यांना अनुसया (पत्नी) आणि पद्माकर (मुलगा) असे दोघेच वारसदार असल्याचे नमूद केले. या अर्ज आणि प्रतिज्ञापत्राच्या आधारे या मिळकतीला वारसदार म्हणून नाव लावले. सदरची मिळकत ही 18 ऑक्टोंबर 2005 रोजी अशोक करमचंद तेजवाणी (रा. बागरोजा हाडको) आणि मनोज सेवकराम वाधवाणी (रा. कोहिनूर अपार्टमेंट, टी. व्ही. सेंटर, सावेडी) यांना एक लाख 82 हजार रूपयांनी ही जमीन विकली. पुन्हा त्यांच्याकडून 8 मे 2006 रोजी दोन लाख रूपयांना ही जमीन खरेदी केली.

ही बाब प्रभाकर भिंगारदिवे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात सख्खा भाऊ पदमाकर भिंगारदिवे यांच्याविरोधात बनावट कागदपत्र तयार करणे आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com