
अहमदनगर (प्रतिनिधी)
डायल 112 नंबरवर आलेल्या फोन मुळे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश आले. याप्रकरणी राजु रघुनाथ अभिनवे (वय 41 रा. रेणाविकार कॉलनी, गाडेकर चौक, निर्मलनगर, सावेडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा, काडतुस व दुचाकी असा 80 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार दीपक आव्हाड, गोरख धाकतोडे यांना गुरूवारी (दि. 17) रात्री डायल 112 सेवेच्या एमडीटी मशीनवर ड्यूटी होती. शुक्रवारी (दि. 18) पहाटे एक च्या सुमारास डायल 112 नंबरवर एक फोन आला. फोनवर बोलणार्या व्यक्तीने सांगितले की, छत्रपती चौक, अक्षदा किरण अपार्टमेंटमध्ये एका दुचाकीमध्ये गावठी कट्टा आहे. अंमलदार आव्हाड यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना दिली.
निरीक्षक साळवे यांनी अंमलदार आव्हाड, धाकतोडे, दीपक जाधव यांना कारवाईच्या सूचना केल्या. पोलिसांनी दोन पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकला असता दुचाकीमध्ये एक गावठी कट्टा, एक काडतुस मिळून आले. पोलिसांनी दुचाकीसह कट्टा, काडतुस जप्त केले आहे. सदर दुचाकीचा मालक राजु अभिनवे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशिवरे करीत आहेत.