
अहमदनगर | सचिन दसपुते
जिल्ह्यात गावठी कट्टे खरेदी-विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गावठी कट्टे खरेदी-विक्रीचे रॅकेट शोधण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकावर दिली आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक काम करत आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये या पथकाने नऊ कट्टे, एक सिंगल बोर गावठी रिव्हॉल्वर, 16 जिवंत काडतुसे पकडली. त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे.
दरम्यान जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट झाला असून खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अनेक तरूण काम करत आहेत. वाळू तस्करी आणि त्यासाठी सर्रास गावठी कट्ट्यांचा वापर केला जात आहे. खास करून अवैध धंदे, धमकावण्यासाठी या कट्ट्यांचा वापर केला जातो. मागील महिन्यात एलसीबीच्या पथकाने शिंगवे तुकाई (ता. नेवासा) येथे गावठी कट्टे विक्रीसाठी घेऊन आलेला तरूण शुभम सुभाष सरोदे (रा. गुंजाळे ता. राहुरी) याला पकडले. त्याच्याकडून दोन कट्टे, एक सिंगल बोर गावठी रिव्हॉल्वर व पाच काडतुस जप्त केले होते. याच गुंजाळे गावात जानेवारी 2022 मध्ये टेलरींग दुकानात गोळीबार होऊन प्रदीप एकनाथ पागिरे या तरूणाचा मृत्यू झाला होता. त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याचे समोर आले होते. तो हातळताना गोळी सुटली आणि त्याचा जीव गेला होता. याच गावातील तरूणाकडे पुन्हा गावठी कट्टे मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.
गुंजाळे गावामध्ये अनेक तरूणांकडे गावठी कट्टे आहेत. सरोदे याच्याकडून जप्त केलेल्या गावठी कट्ट्यांमुळे ही बाब समोर आली आहे. अवैध धंदे करणार्यांसाठी याच गुंजाळे गावातून गावठी कट्ट्यांचा पुरवठा केला जातो. येथील तरूण राहुरीसह नेवासा, श्रीरामपूर, नगर तालुक्यात गावठी कट्टे विक्री करतात. शिंगवे तुकाई शिवारात कट्टे विक्री करण्यासाठी आलेला शुभम सरोदे याच्याकडून पोलिसांनी दोन कट्टे व त्याने स्वत: तयार केलेली सिंगल बोर गावठी रिव्हॉल्वर पोलिसांनी जप्त केले होती. तरूणपिढी या गावठी कट्टे खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सक्रिय झाली आहे. एलसीबीने येथील तरूणाला पकडले असले तरी अजूनही या गावातील अनेक तरूण या धंद्यात असू शकतात यात शंका नाही.
थेट मध्यप्रदेश कनेक्शन
गुंजाळे गावात काही महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबारात प्रदीप पागिरे या तरूणाचा मृत्यू झाला होता. यानंतर पुन्हा याच गावातील तरूणाकडे गावठी कट्टे मिळून आले आहेत. येथील तरूण मध्यप्रदेश येथील जंगलातून हे कट्टे घेऊन येतात आणि ते नगर जिल्ह्यात विक्री करतात, अशी एक शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. नेमंक एलसीबी पथकाने हाच धागा पकडून शुभम सरोदेकडून गावठी कट्टे जप्त केले आहे.
‘हे’ पथक करते काम
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, संदीप दरंदले, रणजित जाधव, संदीप चव्हाण, राहुल सोळुंखे, रविकिरण सोनटक्के यांचे पथक गावठी कट्टे शोधण्यासाठी काम करत आहेत.