जुगाराचा डाव पोलिसांनी मोडला, सात जण पकडले
अहमदनगर (प्रतिनिधी)
कोठला येथील कुरेशी हॉटेलच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी गुरूवारी (दि. 12) दुपारी छापा टाकला. जुगार खेळणार्या सात जणांना पकडले असून त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेल्या जुगार्यांकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, दुचाकी असा एक लाख 96 हजार 550 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार दत्तात्रय कोतकर यांच्या फिर्यादीवरून आर्शद आयुब सय्यद (वय 30 रा. मुकुंदनगर), शुभम विजय देवळालीकर (वय 27 रा. कराचीवालानगर), दीपक बाळू वाघमारे (वय 37 रा. रामवाडी, सर्जेपुरा), संभाजी महादेव निस्ताने (वय 52 रा. सर्जेपुरा), सचिन नारायण खुपसे (वय 45 रा. भगवान बाबा चौक, गणेश कॉलनी), राजु लालु पवार (वय 57 रा. निंबळक ता. नगर), किरण भगतराम बहुगुणा (वय 45 रा. कोठला) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोठला येथील कुरेशी हॉटेलच्या मागे एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने गुरूवारी दुपारी साडे चारच्या सुमारास पंचासमक्ष नमूद ठिकाणी छापा टाकला असता सात जुगारी मिळून आले.