
अहमदनगर (प्रतिनिधी)
न्यायालयाने कुठलाही आदेश दिलेला नसताना न्यायाधिशांची बनावट स्वाक्षरी करून न्यायालयाचा खोटा आदेश तयार करण्यात आला. तो तहसीलदारांना सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी एकाच कुटूंबातील पाच जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नगरच्या कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे अधीक्षक रमेश अनंत नगरकर (वय 57 रा. गुजरगल्ली, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. राधाकिसन रभाजी काळे (वय 41), प्रकाश रभाजी काळे (वय 35), अनिल रभाजी काळे (वय 43), विष्णु रभाजी काळे (वय 45) व रहिबाई रभाजी काळे (वय 35 सर्व रा. देहरे ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पाच जणांविरूध्द न्यायालयात दावा दाखल होता.
सदर दाव्यामध्ये न्यायालयाने 28 ऑक्टोबर, 2015 रोजी कोणताही आदेश दिलेला नसताना पाच जणांनी खोटा आदेश तयार करून आदेशावर दिवाणी न्यायाधीश आर.व्ही.ताम्हाणेकर यांची खोटी सही करून न्यायालयाची फसवणूक केली. खोटी कागदपत्रे तयार करून ते खरे असल्याचे भासवून नगर तहसील कार्यालयात सादर केल्याचे निष्पन्न झाल्याने न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे करीत आहेत.