मुलीचा विनयभंग करणार्‍या आरोपीला सक्त मजुरी

जिल्हा न्यायालयाचा निकाल; राहुरी तालुक्यातील घटना
मुलीचा विनयभंग करणार्‍या आरोपीला सक्त मजुरी

अहमदनगर (प्रतिनिधी)

लघुशंकेसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीसोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणार्‍या आरोपीला अतिरिक्त सह.जिल्हा न्यायाधीश पी.आर.देशमुख यांनी दोषी धरून तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. शिवा उत्तम विधाते (रा. ताहराबाद ता. राहुरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलगी 12 मार्च 2022 रोजी लघुशंकेसाठी स्मशानभुमीकडे गेली असता शिवा विधाते याने तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 354, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त सह.जिल्हा न्यायाधीश देशमुख यांच्या समोर झाली.

सरकारी वकील म्हणून श्रीमती के.व्ही.राठोड यांनी काम पाहिले. त्यांनी एकुण पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी व पीडित मुलगी यांचे साक्षीपुरावे महत्वाचे ठरले. सरकारी पक्षाच्या वतीने साक्षीपुरावा व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी शिवा विधाते याला न्यायालयाने दोषी धरून तीन वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंडाशी शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सरकारी वकील श्रीमती राठोड यांना पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस अंमलदार आर.व्ही.बोर्डे व पोलीस अंमलदार वाय.ओ.वाघ यांनी सहकार्य केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com