
अहमदनगर (प्रतिनिधी)
वरिष्ठांकडे तक्रारी केल्याच्या संशयातून तीन पोलिसांनी सहकारी पोलीस कर्मचार्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. नगर रेल्वेस्थानकात ही घटना घडली. या मारहाणीत रवींद्र भानुदास देशमुख (रा. सारसनगर, नगर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
रवींद्र देशमुख (रा.एकदंत कॉलनी, सारसनगर) हे सुमारे एक महिन्यापासून नगर येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. देशमुख हे मंगळवारी रात्री नऊ वाजता ड्युटीवर होते. त्यावेळेस सहकारी पोलीस कर्मचारी जगताप याने काही कारण नसताना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली.
पोलीस हवालदार मनोज साळवे हातात लाकडी दांडके घेऊन आला. खासगी ड्रेसवर असलेला पोलीस कर्मचारी हर्षल तोरणे हाही त्याठिकाणी आला. आमच्या तक्रारी वरिष्ठांना करतो का ? असे म्हणून दांडक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. तिघांनी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीचे मोबाईलमध्ये शुटिंग करण्यास सुरूवात केल्यावर त्यांनी मोबाईल हिसकावून घेतला.
. या मारहाणीत डावे हाताचे बोटे आणि उजव्या हाताला दुखापत झाली. जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. देशमुख यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी जगताप, मनोज साळवे, हर्षल तोरणे या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.