दरोडा टाकणार्‍या भोसले टोळीवर ‘मोक्का’ न्यायालयात दोषारोपपत्र

सात आरोपींचा समावेश: नगरसह बीड जिल्ह्यात संघटीत गुन्हेगारी
दरोडा टाकणार्‍या भोसले टोळीवर ‘मोक्का’ न्यायालयात दोषारोपपत्र

अहमदनगर (प्रतिनिधी)

नगर-सोलापूर महामार्गावरील साकत (ता. नगर) शिवारात पेट्रोलपंपावर दरोडा टाकून लुटमार करणार्‍या आजिनाथ भोसले टोळीविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी (मोक्का) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांनी करून सुमारे 700 पानी दोषारोपपत्र तयार केले.

अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) के.के.सरंगल यांनी दोषारोपपत्राला परवानगी दिल्यानंतर विशेष मोक्का न्यायालयात ते दाखल करण्यात आले आहे. या टोळीमध्ये सात सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. कृष्णा विलास भोसले (वय 22), रावसाहेब विलास भोसले (वय 40), आजिनाथ विलास भोसले (वय 25), भरत विलास भोसले, करण काळे (सर्व रा. हातवळण दाखले ता. आष्टी जि. बीड), सुरेश पुंजाराम काळे (वय 38 रा. सोनविहीर ता. शेवगाव), पवन युनुस काळे (रा. गुनवडी ता. नगर) यांचा समावेश आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून एक जण पसार आहे.

1 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे नगर-सोलापूर महामार्गावरील साकत शिवारातील पेट्रोलपंपावर दरोडा टाकून लुटमार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दरोडा, आर्म अ‍ॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासादरम्यान सदरचा गुन्हा भोसले टोळीने केल्याचे सिध्द झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.

नगर तालुका पोलिसांनी भोसले टोळींविरोधातील गुन्ह्यांची कुंडली काढून मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला. सदरचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या परवानगीने 20 ऑक्टोबर 2021 रोजी नाशिक येथे पाठविला. या प्रस्तावाला मंजूरी मिळाली होती. भोसले टोळीविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई झाल्यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी केला. आरोपींविरूध्द सुमारे 700 पानी दोषारोपपत्र तयार केले. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यास अप्पर पोलीस महासंचालक यांची परवानगी मिळाल्यानंतर विशेष मोक्का न्यायालयात ते दाखल करण्यात आले आहे.

आरोपी एकमेकांचे नातेवाईक

अजिनाथ भोसले याच्या टोळीमध्ये सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत. अजिनाथ भोसले या टोळीचा प्रमुख आहे. गुन्हा करण्याचे नियोजन तो करत होता. त्याचे साथीदार त्यांना सोपविलेली जबाबदारी पार पडत होते. रावसाहेब आणि भरत या दोन भावांची त्याला साथ मिळत होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com