
अहमदनगर (प्रतिनिधी)
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून पिता-पुत्रांना मारहाण केली. नगर तहसील कार्यालयाच्या बाहेर बुधवारी ही घटना घडली.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सुमारे 10 जणांवर गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी मंदार नवनाथ म्हस्के (वय 18 रा. उक्कडगाव ता. नगर) यांनी खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान पोलिसांना जबाब दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
भालचंद भरत म्हस्के, सागर भरत म्हस्के, भरत किसनराव म्हस्के, सोमनाथ लक्ष्मण म्हस्के व त्यांच्या सोबतचे पाच ते सहा साथीदार (सर्व रा. उक्कडगाव) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. उक्कडगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नवनाथ भानुदास म्हस्के हे बुधवारी नगर तहसील कार्यालयात दुपारी 3 वाजता निवडणूक अधिकार्यांशी बोलत होते. त्यावेळेस भालचंद्र म्हस्के त्या ठिकाणी आला.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणातून शिवीगाळ केली. कार्यालयाच्या बाहेर आल्यावर बघून घेतो, असा दम दिला होता. थोड्या वेळाने नवनाथ म्हस्के हे तहसील कार्यालयाच्या बाहेर आले. त्यावेळेस भालचंद म्हस्के, सागर म्हस्के, भरत म्हस्के, सोमनाथ म्हस्के व पाच ते सहा अनोळखी यांनी नवनाथ यांच्या शर्टची कॉलर धरली आणि मारहाण करण्यास सुरूवात केली.
त्यांचा मुलगा मंदार हा भांडणे सोडविण्यासाठी गेला. त्यावेळेस त्याला ही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत काठी आणि फायटरचा वापर करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. म्हस्के पिता-पुत्रांना शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.