
अहमदनगर (प्रतिनिधी)
मित्रानेच मित्राच्या पोटात चाकू भोकसून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (दि. 6) सायंकाळी नेवासकर पेट्रोलपंपाजवळ घडली. सागर दत्तात्रय जाधव (वय 30 रा. निंबोडी ता. नगर) असे जखमी तरूणाचे नाव असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांनी उपचारादरम्यान कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून त्यांचा मित्र रामा छोटू इंगळे (रा. निंबोडी ता. नगर) याच्याविरूध्द खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. जाधव निंबोडीतील एका खडी क्रेशर कारखान्यावर मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्या गावातील इंगळे हा त्यांचा बालमित्र आहे. दरम्यान, रविवारी जाधव हे त्यांच्या पत्नीसह येथील कापड बाजारात खरेदीसाठी आले होते. इंगळे याने जाधव यांच्या मोबाईलवर फोन करून कामानिमित्त भेटायचे आहे, असे म्हणून तो भेटण्यासाठी नगरमध्ये आला.
इंगळे हा नेवासकर पेट्रोलपंपाजवळ असताना त्याने जाधव यांना पुन्हा फोन करून, माझे पेट्रोल संपले असून तुला यावे लागेल, तु माझा भाऊ आहेस की, असे म्हणाला. तेव्हा जाधव नेवासकर पेट्रोलपंपाजवळ गेले. इंगळे याने जाधव यांच्या गळ्यात हात घालून त्यांना थोडे लांब नेले व अचानक चाकू काढून पोटात भोकसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी जाधव यांना स्थानिक नागरिकांनी खासगी रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, इंगळे याने जाधव यांच्यावर कोणत्या कारणातून हल्ला केला, हे समजू शकले नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.