शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णींवर जीवघेणा हल्ला

सहशिक्षकासही मारहाण || हल्लेखोरांकडे पोलीस यंत्रणेचा कानाडोळा
शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णींवर जीवघेणा हल्ला

अहमदनगर | प्रतिनिधी| Ahmednagar

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-साहित्यिक व येथील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब रामचंद्र कुलकर्णी (वय 52 रा. श्रमिकनगर, सावेडी) यांच्यावर शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास सावेडीतील प्रेमदान हाडको परिसरात लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत असलेले सहकारी शिक्षक सुनील कुलकर्णी यांनाही मारहाण झाली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात कुलकर्णी यांनी शनिवारीच गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांनी याकडे तब्बल दोन दिवस दुर्लक्ष केले. अखेर सोमवारी राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यानंतर पोलीस यंत्रणेला जाग आली.

अधीक्षक राकेश ओला यांनी दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही तासांतच हल्लेखोरांचा शोध घेऊन तिघांना नगर शहरातून ताब्यात घेतले. अक्षय विष्णू सब्बन (वय 30 रा. दातरंगे मळा), चैतन्य सुनील सुडके (वय 19 रा. बालिकाश्रम रस्ता) व एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अक्षय सब्बन याची सीताराम सारडा विद्यालय परिसरात पानटपरी होती. हेरंब कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वीच तक्रार करून ती पान टपरी हटवली होती. याचा राग मनात धरून सब्बन याने अन्य चौघांच्या मदतीने हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. तिघे ताब्यात असले तरी अजून दोघे पसार आहेत. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अधिक माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेरंब कुलकर्णी हे शनिवारी दुपारी त्यांचे सहशिक्षक सुनील कुलकर्णी यांच्या दुचाकीवर बसून प्रेमदान हाडको परिसरातून त्यांच्या घराकडे जात असताना रासणेनगरमध्ये मोपेड दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचे वाहन अडविले. लोखंडी रॉडने हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करण्यात आली. सुनील कुलकर्णी यांनी हल्लेखोरांपासून हेरंब कुलकर्णी यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. जमाव जमल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. त्यातील तिघांना सोमवारी रात्री ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाचे सहा.निरीक्षक गणेश वारूळे, उपनिरीक्षक सोपान गोरे, तोफखान्याचे उपनिरीक्षक सचिन रणशेवरे एलसीबीचे अंमलदार दत्ता हिंगडे, बापूसाहेब फोलाणे, संदीप पवार, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, लक्ष्मण खोकले, सचिन आडबल, सागर ससाणे, रवींद्र घुंगासे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

हेरंब कुलकर्णी राज्याला शिक्षण, एकल महिला, दारूबंदी चळवळीतील सक्रीय समाजसेवक म्हणून परिचित आहेत. सीताराम सारडा विद्यालयात मुख्याध्यापकपदी काही महिन्यांपूर्वी ते रूजू झाले. शाळेजवळ रस्त्यावर असलेल्या पान-तंबाखूच्या टपर्‍या त्यांनी हटवल्या तसेच शाळेच्या आजूबाजूला बेकायदेशीरपणे लावल्या जाणार्‍या चारचाकी वाहनांकडून दंड वसुली केल्याने या रागातून त्यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगितले जाते. मात्र, सामाजिक काम करणार्‍या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉडने त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार उद्विग्न करणारा आहे, अशी भावना सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. याबाबत तीव्र संतापाच्या प्रतिक्रया उमटल्या. शासनाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधावे, असे आवाहन त्यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी केले आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेत घटनास्थळ पंचनामा केला असून घटनेवेळी उपस्थित असलेल्या नागरिकांचे जबाब नोंदविले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जखमी हेरंब कुलकर्णी यांची सोमवारी दुपारी भेट घेतली. अधीक्षक ओला यांनी तपासाबाबात एलसीबी व तोफखाना पोलिसांना सूचना केल्यानंतर काही तासातच एलसीबी पथकाने तिघांना ताब्यात घेतले.

सामाजिक संघटनेचे एसपींना निवेदन

शनिवारी दुपारी हल्ला झाल्यानंतर पोलिसानी तात्काळ दखल न घेतल्याने सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी दुपारी पोलीस अधीक्षक ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. हल्यामागे नेमके कोण लोक आहेत, वरिष्ठ अधिकार्‍यांचे तपास पथक नियुक्त करून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा तसेच हेरंब कुलकर्णी यांच्या जीवाला धोका असून त्यांना शासनाने पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

पोलीस कुलकर्णींवरच डाफरले; खा.सुळेंनी लावला डोक्याला हात

मला मारहाण करण्याची घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली, त्यानंतर मी पोलीस ठाण्यात गेल्यावर मला चार तास बसवून ठेवले. दुसर्‍या दिवशी पंचनामा व जबाबासाठी गेल्यावरही दोन तास थांबवले. मात्र, सामाजिक कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन दिल्यावर, तुम्ही कोणीतरी वेगळे असल्याचे व मोठे असल्याचे आधी सांगायचे ना राव...अशा शब्दांत पोलीसच माझ्यावर डाफरले...सामाजिक कार्यकर्ते मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णींचे हे भाष्य ऐकून खा. सुप्रिया सुळेंनी डोक्याला हात लावला व म्हणाल्या, गृहमंत्री कॉमन माणसाला कशी वागणूक मिळते ते पाहा...हेरंब व माझे बहीण-भावाचे नाते आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. कोविड विधवांसाठी त्यांनी अप्रतिम काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील हल्ला धक्कादायक आहे. हल्लेखोरांवर कडक कारवाई होईपर्यंत मी या घटनेचा पाठपुरावा करणार आहे, असे खा. सुळे यांनी यावेळी आवर्जून स्पष्ट केले.

हल्लेखोरांवर कडक कारवाई करा

मुख्यमंत्र्यांचे एसपींना आदेश; शिंदे यांनी हेरंब कुलकर्णी यांच्याशी साधला संवाद

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

शिक्षण क्षेत्राबाबत विपुल लेखन केलेले ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर येथे झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी गंभीर दखल घेतली. कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणार्‍या हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी असे निर्देश शिंदे यांनी यावेळी अहमदनगर पोलीस अधीक्षकांना दिले.

हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांना लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली. यावेळी कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून तब्येतीबद्दल विचारणा केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

गेल्या काही दिवसांपासून शाळेपासून 100 मीटरच्या अंतरावर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी आपण आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. याच गोष्टीचा आकस मनात बाळगून आपल्यावर हल्ला करण्यात आला असावा, अशी शक्यता त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांना आश्वस्त केले. तसेच हेरंब कुलकर्णी यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांशी देखील संवाद साधून शिंदे प्रकृतीची माहिती घेणार आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com