
अहमदनगर (प्रतिनिधी)
जेवण करत असताना आमच्याकडे का पाहिले, असे म्हणून एका तरूणास कोयत्याने मारहाण केली. शहरातील चितळे रस्त्यावर बुधवारी रात्री पावणे नऊ वाजता सुमारास ही घटना घडली.
रवी कचरू गोंधळी (वय 28, रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांनी गुरूवारी कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
अब्दुल सय्यद (रा. विणकर सोसायटी, शिवाजीनगर, नगर-कल्याण रोड) व इतर तीन अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. रवी गोंधळी हे बुधवारी रात्री साडेआठ वाजता चितळे रस्त्यावरील साई हॉस्पिटल शेजारील एका टपरीवर बिर्याणी खाण्यासाठी गेले होते. त्यावेळेस त्या ठिकाणी अब्दुल सय्यद हा अगोदरच तीन मित्रांसह तेथे जेवण करत होता. त्यावेळेस अब्दुल सय्यद याने रवी गोंधळी यास ‘तू आमच्याकडे का बघतो’, असे म्हणून भांडणे सुरू केली.
सय्यद आणि त्याच्यातील साथीदारांनी कोयत्याने मारहाण केली. ही माहिती भाऊ निशांत गोंधळी याला समाजल्यानंतर तो मदतीसाठी आला. त्यांनी जखमी रवी गोंधळी यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. या मारहाणीत डोक्यात गंभीर दुखापत झालेली असून डोक्याला सहा टाके टाकण्यात आले आहेत. गोंधळी यांच्याजवळ फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.