
अहमदनगर (प्रतिनिधी)
शहरात हिंदूराष्ट्र सेनेच्या (Hindurastra Sena) कार्यकर्त्याला युवासेनेचे (Yuvasena) जिल्हाप्रमुख विक्रम राठोड (Vikram Rathod) यांनी दमबाजी करत लग्न होऊ न देण्याची तसेच पक्षाचे काम न केल्यास तुझा काटा काढू, अशी धमकी दिली आहे. अशी माहिती गजेंद्र सेंदर (Gajendra Sender) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
सैंदर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांची भेट घेत याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. गजेंद्र सैंदर हे गेल्या काही वर्षांपासून हिंदूराष्ट्र सेनेचे काम करत आहेत. यादरम्यान त्यांची युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर राठोड यांनी सेंदर यांना शिवसेना पक्षात प्रवेश करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास सांगितले. त्यास सैंदर यांनी नकार दिला असता राठोड यांनी तुम्ही कसे काम करता, मी पाहन घेतो असे म्हणत धमकी दिली होती.
त्यानंतर १० एप्रिल रोजी श्रीरामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान विक्रम राठोड यांना कोयता दाखवून सेंदर यांनी धमकी दिल्याप्रकरणी सैंदर यांच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा राजकिय दबावातून दाखल झाला असल्याचे सैंदर यांनी सांगितले. तसेच या गुन्ह्यात न्यायालयाने सैंदर यांना जामीन मंजूर केला असल्याने तुला जामीन तर मिळाला पण आता तुझे लग्न कसे होते ते मी पाहतो, अशी धमकी राठोड यांनी दिली आहे. तसेच लग्नाआधी आणखी गुन्हे दाखल करणार असल्याचे राठोड यांनी सैंदर यांना म्हटले आहे.