
अहमदनगर (प्रतिनिधी)
आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवीगाळ करत दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करून त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल केल्याचा प्रकार नगर शहरात घडला आहे. याप्रकरणी रिपाईचे पदाधिकारी सुशांत म्हस्के (रा. सर्जेपुरा) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पांडूरंग कोंडके (वय 31 रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.
कोंडके हे कल्याण रस्त्यावरील व्दारका फिटनेस क्लब येथे जिम ट्रेनर म्हणून नोकरी करतात. ते 14 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता व्दारका फिटनेस क्लब येथे असताना त्यांच्या मोबाईलवरील इन्स्टाग्रामवर एका आयडीवर एक व्हिडीओ पोस्ट केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या व्हिडीओ मध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून वक्तव्य केलेले होते. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा तो व्हिडीओ होता. कोंडके यांनी सदर व्हिडीओ मधील व्यक्तीबाबत त्यांचे मित्र अॅड. हरीष भांबरे (रा. सारसनगर), रोहित कोंडके व इतर आणखी लोकांकडे चौकशी केली असता तो व्यक्ती सुशांत म्हस्के असल्याचे समोर आले. त्यानंतर म्हस्के विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.