दुसरी बैठकही फिस्कटली

महापालिका । कर्मचारी संघटनेला हवे 20 हजार सानुग्रह
दुसरी बैठकही फिस्कटली

अहमदनगर (प्रतिनिधी) - दिवाळीसाठी महापालिका कर्मचार्‍यांना वीस हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. त्यासंदर्भात आयुक्तांकडे आज मंगळवारी दुसर्‍यांदा बैठक झाली. मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही. आज रात्री पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली.

दहा दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. कोरोना संकट काळात महापालिका कर्मचार्‍यांनी जीव धोक्यात घालून काम केले. काहींचा जीवही गेला. कर्मचारी कुठेही कमी पडत नाही. त्यामुळे दिवाळी सणासाठी महापालिका कर्मचार्‍यांना वीस हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी कर्मचारी युनियनने केली आहे. 30 ऑक्टोबरला उपायुक्त प्रदीप पठारे यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यात तोडगा निघाला नव्हता. आज मंगळवारी पुन्हा दुसर्‍यांदा आयुक्तांकडे बैठक झाली. आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त प्रदीप पठारे, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर, आयुब शेख बैठकीला उपस्थित होते. वीस हजार रुपयांची मागणी लोखंडे यांनी कायम ठेवली. महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही. वसुली झालेली नाही असे सांगत तितके सानुग्रह अनुदान देणे शक्य नसल्याची भूमिका आयुक्त मायकलवार यांनी मांडली. या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली. आता आज रात्री पुन्हा त्याच विषयावर बैठक होणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

तर कामबंद आंदोलन

  • महापालिकेने आमची मागणी मान्य केली नाहीतर सफाई कर्मचार्‍यांसह सगळेच कर्मचारी सामुहिक आंदोलन करतील असा इशारा लोखंडे यांनी बैठकीत दिला. मागणी मान्य करा अथवा आंदोलनाला सामोरे जा अशी भूमिका मांडल्यामुळेच आयुक्तांनी संध्याकाळी पुन्हा बैठकीचे आयोजन केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com