नगरकरांची चिंता वाढली

शनिवारी आढळले नवे 225 करोना पॉझिटिव्ह
नगरकरांची चिंता वाढली
करोना अपडेट

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी राज्यासह देश पातळीवर चिंतेचा विषय ठरलेल्या नगर जिल्ह्यात आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येसह उपचाराधीन रुग्णसंख्याही सतत वाढत आहे.

शनिवारी नगर जिल्ह्यात नव्याने 225 करोना रुग्णसमोर आले आहेत. यामुळे उपचार घेणार्‍यांची संख्या एकदम 750 वर पोहचली आहे. यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला धडकी भरण्यास सुरूवात झाली असून लसीकरणावर भर द्यावा लागणार आहे.

जिल्ह्यात गेला महिनाभर जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या स्थिर होती. दैनंदिन रुग्ण 40 ते 70 च्या आसपास तर उपचाराधीन रुग्ण 300 च्या आसपास होते. दोन-तीन दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज नव्या 225 रुग्णांची भर पडली. आठवड्याच्या आतच रुग्णसंख्या दुप्पट झाल्याचे पाहायला मिळते. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.83 टक्क्यांवर आले आहे.

सुदैवाने मृत्यूंचे प्रमाण अद्याप कमी आहे. रुग्णवाढीचे प्रमाण नगर शहरात जास्त आहे. दुसर्‍या लाटेत राज्यातील रुग्ण संख्या ओसरली तरीही नगरमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यानंतर रुग्णसंख्या घटल्याने आणि बराच काळ स्थिर राहिल्याने दिलासा मिळाला होता.

राज्यभर ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असली तरी नगर जिल्ह्यात आतापर्यंच केवळ एकच रुग्ण आढळून आला. तोही आता ठणठणीत बरा होऊन घरी गेला आहे. त्यानंतर पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात करोनाचा शिरकाव झाला. तेथे तब्बल 82 विद्यार्थी करोना बाधित आढळले. आता तेही बरे झाले आहेत.

दरम्यान, शुक्रवारअखेर करोना प्रतिबंधक लसीकरणात प्रौढांपेक्षा किशोरवयीन मुला-मुलींनी आघाडी घेतली आहे. वर्षभरात 80 टक्के प्रौढांनी करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्या तुलनेत पाच दिवसात किशोरवयीन वयोगटातील 97 हजार 400 (40 टक्के) पल्ला ओलांडला आहे. यामुळे करोनाच्या बाबतीत प्रौढांपेक्षा किशोरवयीन मुले अधिक गंभीर असल्याचे दिसत आहे. तर जिल्ह्यातील एकूण लसीकरणाचा आकडा 17 लाख 96 हजार 297 असून त्याची टक्केवारी 49.8 टक्के झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com