अहमदनगर : ‘स्व’बळाच्या घोषणनेनंतर काँग्रेस आक्रमक

महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची आतापासून तयारी : ना. थोरातांचा निर्णय अंतिम
अहमदनगर : ‘स्व’बळाच्या घोषणनेनंतर काँग्रेस आक्रमक

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या ‘स्व’ बळाच्या घोषणेेचे नगर शहर काँग्रेसतर्फे स्वागत करण्यात आले. आघाडी करताना जिंकणे शक्य असलेल्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:कडे ठेवत असल्याने आतापर्यंत काँग्रेसचे शहरात नुकसानच झालेले आहे. यामुळे मनपात आतापासूनच काँग्रेस विरोधकाची भूमिका बजावणार असून आगामी निवडणुका आक्रमकपणे स्वतंत्र लढण्याचा निर्धार करण्यात आला असून अंतिम निर्णय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात घेणार असल्याचे शहर काँग्रेसकडून सांगण्यात आले.

दिल्लीत काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या समवेत राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष आ. पटोले यांनी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढेल, अशी घोषणा केली. त्याचेच पडसाद लगेच नगरमध्ये उमटले आहेत. नगर शहराच्या आणि मनपात गेल्या काही काळापासूनच काँग्रेसने उघडपणे विरोधाची भूमिका घेतली आहे.

येणार्‍या मनपा निवडणुकीसाठी आत्तापासूनच संभाव्य उमेदवारांना त्या-त्या प्रभागात ताकद देण्याचे काम काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे. पक्षात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू असून अजून अनेक चांगले आणि वजनदार चेहरे पक्षात येण्याच्या वाटेवर आहेत. ना. थोरात यांच्याशी चर्चा करून योग्य वेळी त्यांनाही प्रवेश दिले जाईल, असे शहर काँग्रेसकडून सांगण्यात आले.

यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राहिलेली आहे. ज्या प्रभागांमध्ये काँग्रेसचा मतदार आहे, त्याच प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचा देखील असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा राष्ट्रवादीला कायमच फायदा झाला आहे. दर वेळच्या जागा वाटपामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी म्हणून निवडून येऊ शकणार्‍या जवळपास सर्वच जागा या राष्ट्रवादी आपल्या पदरात पाडून घेते आणि इतर पक्षांचे प्राबल्य असणार्‍या प्रभागांमध्ये काँग्रेससाठी जागा सोडत. यामुळे काँग्रेसच्या ताकदीचा उपयोग राष्ट्रवादीला झाला.

उलटपक्षी काँग्रेसचे खच्चीकरण झाले, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सध्याची शहरातील राजकीय परिस्थिती पाहता सर्वच पक्ष एकत्र आल्याचे चित्र आहे. मात्र, काँग्रेस या सर्वपक्षीय सहमती एक्सप्रेसचा भाग नाही. निवडणुका अद्याप दूर असल्या तरीही त्या डोळ्यासमोर ठेवूनच संघटनात्मक बांधणीसाठी आतापासूनच कंबर कसली आहे. त्यातच आता ‘स्व’ बळाच्या नार्‍यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना मरगळ झटकवून मनपा निवडणुकीसाठी आत्तापासूनच कामाला लावण्याची व्यूहरचना शहर जिल्हा काँग्रेसने आखली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com