काँग्रेसने अखेर भुज'बळ' गोठविले!

प्रदेशाध्यक्षांकडून निलंबनाचा बडगा
काँग्रेसने अखेर भुज'बळ' गोठविले!

अहमदनगर | प्रतिनिधी

नगर (ahmednagar) शहर काँग्रेसमधील (congress) काळे-भुजबळ गटाचा वाद नव्या टप्प्यावर पोहचला आहे. प्रदेश काँग्रेसने माजी शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ (balasaheb bhujbal) यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्या आदेशाने ही कारवाई झाली. दरम्यान, या कारवाईमुळे पक्षातील निष्ठावंत विरूद्ध उपरे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे (kiran kale) विरूद्ध भुजबळ या गटातील पक्षांतर्गत वादाने पक्षात काही महिन्यांपासून धुसफूस सुरू आहे. आधी राष्ट्रवादीत असलेल्या काळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शहर जिल्हाध्यक्षपद पटकावले. त्यानंतर जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये याबाबत रोष होता. भुजबळ यांनी उघडपणे विरोधी भुमिका घेतली होती. काळे आपली भुमिका पक्षाची म्हणून मांडत असताना भुजबळ त्याविरोधी विचार मांडत असल्याने वाद विकोपाला गेला होता.

स्थानिक राजकारणात ज्यांना काळें विरोध करतात त्यांचे समर्थन भुजबळ गटाने केले. एकाच पक्षाची वेगवेगळी आंदोलने अनुभवण्याची वेळ नगरकरांवर आली होती. काळे यांनी हे प्रकार पक्षविरोधी असल्याची तक्रार प्रदेश काँग्रेसकडे केली होती.

या तक्रारींनंतर प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी ८ सप्टेंबर रोजी भुजबळांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षांकडे खुलासा सादर केला होता. हा सादर केलेला खुलासा असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com