काँग्रेसमधील धुसफूस; बंडखोर गटाची प्रदेशाध्यक्षांकडे फिल्डींग

थोरातांना टाळून पटोलेंशी चर्चा
काँग्रेसमधील धुसफूस; बंडखोर गटाची प्रदेशाध्यक्षांकडे फिल्डींग

अहमदनगर | प्रतिनिधी

नगर शहरातील काँग्रेसच्या (Ahmednagar congress) बंडखोर गटाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची भेट घेवून विद्यमान पदाधिकाऱ्यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून पक्षात सुरू असलेली धुसफूस निवळण्याऐवजी अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.

पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवून शहर ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांना पक्षाने नोटीस बजावली होती. भुजबळ व त्यांच्या समर्थकांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या विरोधात सातत्याने आपली भुमिका मांडली आहे. नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी थेट प्रदेश पातळीवर नगर शहरातील पक्षांतर्गत गाऱ्हाणे पोहचविण्याची संधी घेतली आहे.

नगर शहर काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भुजबळ यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष आ. पटोले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन शहरातील काँग्रेस स्थितीबाबत चर्चा केली. कारणे दाखवा नोटीसीसंदर्भात शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्षांशी तपशिलवार चर्चा केली. प्रदेशध्यक्ष आ. पटोले यांनी सर्व बाजू समजून घेत शहरात पक्षाचे काम निष्ठेने करा, असे आवाहन केल्याचा दावा भुजबळ गटाने केला आहे.

प्रदेश काँग्रेसचा 'यर्थ न हो बलिदान' हा कार्यक्रम नगर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात आयोजित करुन स्वातंत्र्य लढ्यात पं. नेहरु यांच्यासह बारा राष्ट्रीय नेत्यांच्या किल्ल्यातील बंदीवासाच्या घटनेला उजाळ द्यावा, असा प्रस्ताव यावेळी देण्यात आला. राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांच्यासह प्रदेशाध्यक्षांनी भुईकोट किल्ल्याला भेट देण्याचे निमंत्रण दिले.

शिष्टमंडळात भुजबळ यांच्यासमवेत जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, शहर सरचिटणीस अभिजित कांबळे, शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, भिंगार महिला काँग्रेस अध्यक्षा मागरिट जाधव, सौ.प्रभावती क्षेत्रे, सौ. रजनी ताठे, सौ. किरणताई आळकुटे, शहर चिटणीस मुकुंद लखापती, अजहर शेख, राजेश बाठिया, संतोष धीवर, देवदत्त भांबळ, सुभाष रणदिवे, शहर उपाध्यक्ष एम. आय. शेख, आर. आर. पाटील, रवि सुर्यवंशी, संतोष कांबळे होते.

Related Stories

No stories found.