काँग्रेसच्या पक्ष संघटनेत सर्व समाज घटकांना न्याय
सार्वमत

काँग्रेसच्या पक्ष संघटनेत सर्व समाज घटकांना न्याय

प्रदेशाध्यक्ष ना. थोरात : पक्षाच्या सर्व आघाड्यांची नगरमध्ये बैठक

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक बांधणी नव्याने करण्यात येणार आहे. जिल्हा काँग्रेस, नगर शहर व सर्व तालुका काँग्रेस कमिटी आणि त्यांचे पदाधिकारी कालबद्ध पद्धतीने निश्चित करण्यात येणार असून जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेतील पदाधिकारी निवडताना सर्व समाजातील सामाजिक घटकांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, अशी भूमिका पक्षाचे प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी मांडली.

जिल्हा काँग्रेस व शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व सर्व संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत अध्यस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख, दीप चव्हाण, जिल्हा परिषद सभापती मीराताई शेटे, जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, सर्व तालुकाध्यक्ष व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ना. थोरात म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेस संघटने बरोबरच विविध सेलच्या कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे विविध प्रश्न मांडणारे व शेतकर्‍यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती देणार्‍या काँग्रेस प्रणित किसान सेलची निर्मिती करण्यात येणार असून प्रत्येक तालुका पातळीवर किसान सेलची संघटना कार्यरत करण्यात येईल. आ. तांबे म्हणाले, काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मार्गदर्शनपर शिबिरे ऑनलाईन घेण्यासाठी राबविण्यात येतील.

राठोड कुटुंबियांचे सांत्वन

महसूल मंत्री ना. थोरात यांनी शिवसेना उपनेते स्वर्गीय अनिल राठोड यांच्या शिवालय या कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी दिवंगत राठोड यांना आदरांजली वाहिली. तसेच स्वर्गीय राठोड यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक यांचे देखील सांत्वन केले.राठोड यांच्या जाण्यामुळे एक चांगला मित्र आपण गमावला, अशी भावना व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, गिरीश जाधव, अशोक दहिफळे, आनंद लहामगे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com