
अहमदनगर (प्रतिनिधी)
सदोष बियाणे प्रकरणी (defective seeds case) राहाता (rahata) आणि श्रीरामपूर (shrirampur) तालुक्यातील १२ शेतकऱ्यांना (farmers)....
तीन लाख ७२ हजार ७९० रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे (District Consumer Forum) अध्यक्ष व्ही. सी. प्रेमचंदानी, सदस्या चारूशीला डोंगरे, एम. एन. ढाके यांनी दिला आहे. राहुरी येथील महात्मा फुले विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने ही भरपाई द्यावी, असा आदेश दिला आहे.
राहाता आणि श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी मच्छिंद्र चौधरी, मच्छिंद्र घोलप, किशोर बनकर, बद्रीनाथ गाढवे, मंदा गाढवे, संतोष कुदळे, संभाजी कुंदे, रामनाथ भवार, दादासाहेब सोनटक्के, राजेंद्र भवार, संजय भवार, सुभाष करीर यांनी २०१६ मध्ये महात्मा फुले विद्यापीठ (राहुरी) यांनी उत्पादीत केलेले आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने विक्री केलेले सोयाबिनचे जे. एस. ९३०५ या वाणाचे बियाणे खरेदी केले होते. शेतकऱ्यांनी हे बियाणे पेरल्यानंतर बहुतांश बियाणे उगवले नव्हते.
शेतकऱ्यांनी महात्मा फुले विद्यापीठ आणि बियाणे महामंडळाकडे याबाबत तक्रार केली होती. कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीने या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन सोयाबीनची पाहणी केली होती. या पाहणीमध्ये सरासरी २४ टक्केच बियाणे उगवल्याचा अहवाल दिला होता. या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी मागणी विद्यापीठ आणि बियाणे महामंडळाकडे केली होती. त्यांना भरपाई न मिळाल्याने अॅड. श्याम असावा यांच्यामार्फत नगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
आयोगाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून विद्यापीठ आणि महामंडळास दोषी धरले. बियाणे खरेदीची एकूण रक्कम एक लाख ५६ हजार ७९० रुपये तसेच बियाणे खरेदी केल्यापासून त्यावर दरसाल दर शेकडा ९ टक्के व्याज, शेतकऱ्यास आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी १५ हजार, तक्रारीचा खर्च तीन हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे.