नगरकर गारठले

रस्त्यावर अघोषित संचारबंदी
नगरकर गारठले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गत दोन तीन दिवसांपासून नगर जिल्ह्यात थंडीची लाट असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या हंगामातील सर्वाधिक थंडी काल गुरूवारी नगरकरांना अनुभवायास मिळाली.

बुधवार पाठोपाठ नगर जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर थंड, झोंबणारे वारे वाहत होते. त्यामुळे नगरकर गारठून गेले.घरात अनेकांनी हिटर तसेच शेकोटीचा आधार घेतला. तसेच गरम कपडे घालूनच बाहेर पडावं लागले. सकाळी धुके होते. त्यानंतर थंड वारे आणि जोडीला आभाळ आलेले असल्याने ग्रामीण भागासह शहरांमध्ये अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. दिवसाही अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी शेकोटीचा आधार घेतला.

ऐन करोनाच्या काळात थंडीचा कडाका वाढल्याने माठातील पाणीही फ्रिजमधील पाण्यासारखे झाले होते. सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे असे त्रास सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेकांना पाणी गरम करून प्यावे लागले. या थंडीचा फटका व्यावसायिकांनाही सहन करावा लागला. थंडीमुळे चहा व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत. चहा पिण्यासाठी ठिकठिकाणी चहाच्या दुकानांवर गर्दी पहावयास मिळाली. या थंडीमुळे द्राक्ष बागायतदारही धास्तावले आहेत. अन्य फळबागांनाही फटका बसला आहे. बिबट्यांची दहशत आता त्या जोडीला थंडी आल्याने शेती कामाचे नियोजनही विस्कटले आहे.

Related Stories

No stories found.