अहमदनगर (प्रतिनिधी)
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी दाखल गुन्ह्यात निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा तसेच डॉ. सुरेश ढाकणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील दोन्ही बाजुंचा युक्तीवाद शुक्रवारी पूर्ण झाला आहे. या अर्जावरील निर्णय आज (शनिवार) दिला जाणार आहे.
जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर डॉ. पोखरणा आणि डॉ. ढाकणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. सरकारतर्फे अॅड. केदार केसकर यांनी युक्तीवाद केला. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम ऑडिट झालेले नाही. विद्यत विभागाचे ऑडिट झालेले नाही. अशा परिस्थितीमध्ये अतिदक्षता विभाग या इमारतीमध्ये सुरू करण्याचा निर्णय कोणी घेतला आहे. रुग्णालयाचे प्रमुख म्हणून डॉ. पोखरणा यांना ही जबाबदारी टाळता येत नाही, असा युक्तीवाद अॅड. केसकर यांनी केला. डॉ. ढाकणे यांच्यावतीने अॅड. गर्जे यांनी अटकपूर्व जामीन द्यावा, असा युक्तीवाद केला. त्यास सरकारतर्फे अॅड. केसकर यांनी आक्षेप घेतला.
दरम्यान शिवसेनेचे शहर उपप्रमुख गिरीष जाधव यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय कारभाराबाबत सातत्याने प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. दुर्घटना घडण्यापूर्वीही येथील असुविधांकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे त्यांना जामीन अर्जात हस्तक्षेप करण्यास परवानगी द्यावी, असे म्हणणे अॅड. अभिजित पुप्पाल यांनी सादर केले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून त्यांचा हस्तक्षेप अर्ज मंजूर केला आहे.