जिल्हा रुग्णालय आग प्रकरण : डॉ. विशाखा शिंदेसह चौघांना जामीन

महिला आयोगाने मागितला अहवाल
जिल्हा रुग्णालय आग प्रकरण : डॉ. विशाखा शिंदेसह चौघांना जामीन

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे यांच्यासह परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख व परिचारक चन्ना आनंत यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान जामीन मंजूर झालेल्या डॉ. शिंदेसह चौघांना अहमदनगर जिल्हा सोडून जाता येणार नाही. तसेच गुन्ह्याच्या तपासात तपासी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, साक्षीदारांवर दबाव आणू नये या अटीवर जामीन मंजूर केला आहे.

६ नोव्हेंबर रोजी अतिदक्षता विभागाला आग लागल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सरकारने जिल्हा शल्य चिकित्सकांसह शल्य. सहा जणांवर कारवाई केली होती. पोलिसांच्या हाती पुरावे आल्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांच्यासह चौघांना अटक केली होती. त्यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. गुरुवारी या अर्जावर दोन्ही बाजूने युक्तीवाद पूर्ण झाला. न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. शुक्रवारी न्यायालयाने निर्णय देत जामीन अर्ज मंजूर केला आहे.

महिला आयोगाने मागितला अहवाल

जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्रिटमध्ये म्हटले आहे की, जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणी राज्य सरकार संवेदनशील आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी असलेल्या विशाखा शिंदे या अस्थिरोग विभागात शिकणाऱ्या विद्यार्थिनी असून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉ. शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करताना कोणते निकष लावण्यात आले. तसेच संबंधित विभागातील रुग्णालयाची जबाबदारी त्यांच्यावर होती का ? किंवा रुग्णालय प्रशासनाने तसे आदेश दिले होते का? या बाबतचा सद्यस्थिती दर्शक अहवाल राज्य महिला आयोगाने मागवला आहे. अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com