लेखी आश्वासनानंतर डॉक्टर, परिचारिकांचे आंदोलन मागे

जिल्हा रुग्णालय आग प्रकरण : रुग्णांना दिलासा
लेखी आश्वासनानंतर डॉक्टर, परिचारिकांचे आंदोलन मागे

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारीकांचे गेल्या ११ दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू होते. शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्ष सुरेखा आंधळे यांनी दिली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका कामावर हजर झाल्याने सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ६ नोव्हेंबर रोजी आग लागून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सरकारने जिल्हा शल्य चिकित्सकांसह सहा जणांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून एक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यासह चौघांना अटक केली. केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर, चतुर्थश्रेणी कामगार यांनी ९ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळाला.

शुक्रवारी जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य कर्मचारी संघटना यांच्यामध्ये चर्चा होऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यावेळी परिचारिका संघटना, डॉक्टर संघटना, चतुर्थश्रेणी कामगार संघटना आदींचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरेखा आंधळे यांनी सांगितले की, आमचे सुरू असलेले आंदोलन आज आम्ही मागे घेत आहोत. जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेस कोणीही परिचारिका जबाबदार नाही, असे आमचे ठाम मत आहे. ही बाब आम्ही वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन, आरोग्यमंत्र्यांसमोर मांडलेली आहे. त्या अनुषंगाने यापुढे आम्हाला संरक्षण देण्याचे प्रशासनाने मान्य केलेले आहे.

गृह, आरोग्यमंत्र्यांची भेट

अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीनंतर परिचारिका, परिचारक यांच्यावर शासनाने केलेले निलंबन आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून केलेली अटक, सदोष मनुष्यवधाचे लावलेले कलम यासर्व गोष्टी परिचरिकांवर अन्यायकारक आणि त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या आहेत. त्यामुळे ही कारवाई मागे घेण्यात यावी, अशी विनंती परिचारिका, डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मुंबईत भेटून केली आहे. यावेळी महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुरेखा आंधळे, जिल्हा परिषद परिचारिका संघटनेच्या राज्य सचिव लता पाटील, डॉ. गंगोटे, डॉ. सायगावकर, डॉ. खेडकर, सचिन बैद आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com