नगर शहराला हवेत दोन पोलीस उपअधीक्षक

जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्रस्ताव || तोफखाना, कोतवालीचे होणार विभाजन
नगर शहराला हवेत दोन पोलीस उपअधीक्षक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहराचा विस्तार वाढत असल्याने कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यांच्या विभाजनासह शहरासाठी एक ऐवजी दोन पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त व्हावेत, असा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून नगर शहराचा विस्तार होत आहे. केडगाव, बोल्हेगाव, नागापूर, तपोवन रोड, कल्याण रोड आदी महापालिका हद्दीतील उपनगरांमध्ये दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. पर्यायाने या भागातील गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ होत आहे. सद्यस्थितीत नगर शहरात कार्यरत असलेल्या कोतवाली व तोफखाना या दोन पोलीस ठाण्यांच्या अंतर्गतच हा सर्व भाग येत आहे.

क्षेत्रफळाच्यादृष्टीने व वाढती गुन्हेगारी. लोकसंख्या, रहदारी आदींच्या पार्श्वभूमीवर केडगाव, बोल्हेगाव, सावेडी भागात नागरिकांकडून स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी सातत्याने होत आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाने केडगाव व सावेडी या दोन नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सादर केलेला आहे. मात्र, अद्यापही हे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेतच आहेत.

तसेच, पोलीस ठाण्यांचे विभाजन झाल्यानंतर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन शहरासाठी दोन पोलीस उपअधीक्षक असावेत, असा प्रस्तावही करण्यात आला आहे. कोतवाली, केडगाव, भिंगार व नगर तालुका यासाठी एक व तोफखाना, सावेडी व एमआयडीसी पोलीस ठाण्यासाठी एक असे दोन स्वतंत्र पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी असावेत, असा प्रस्ताव करण्यात आल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com