विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने नगरला धुतले
सार्वमत

विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने नगरला धुतले

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर रात्री पावसाने नगर शहराला अक्षरशः झोडपले. शहरात बहुतांश ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. अनेक ठिकाणी वीज गायब झाल्याने जोराच्या पाऊस, तेवढाच वारा आणि सर्वत्र अंधार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. गुरुवारी दिवसभर प्रचंड उकाडा होता. नागरिक घामाघूम झाले. दुपारनंतर आकाशात ढग साचायला सुरुवात झाली. त्यानंतर अंधारून आले.

सायंकाळी सहाच्या सुमारास रिपरिप सुरू झाली. बराचवेळ ही रिपरिप सुरू होती. मात्र रात्री साडेसात नंतर जोराचा वारा आणि त्या सोबत मोठमोठे थेंब सुरू झाले. हा जोराचा पाऊस सुमारे दीड दोन तास कोसळत होता. या पावसामुळे घामाघूम झालेल्या नगरकरांना दिलासा मिळाला. मात्र काही ठिकाणी पाऊस सुरू होण्यापूर्वी तर काही ठिकाणी पाऊस सुरू झाल्यानंतर वीज गायब झाली. विजांचा कडकडाट, जोराचा वारा, धो धो कोसळणारा पाऊस आणि सर्वत्र अंधार अशी परिस्थिती निर्माण झाली.

अनेक भागात रात्री उशिरापपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. मध्यंतरी गायब झालेला पाऊस गेल्या दोन दिवसांपासून सक्रीय झाला आहे. शहरासोबतच परिसरातील गावांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. नगर शहरातील बहुतांश भागात गुडघाभर पाणी साचले होते. त्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. रात्री उशिरापर्यंत कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळतच होत्या.

Deshdoot
www.deshdoot.com