अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात चोर्या, घरफोड्याचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी टिळक रोडवरील मोबाईल शॉपीचे शटर उचकटून विविध कंपन्याचे मोबाईल,

रोख रक्कम असा 33 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात धीरज शिवाजी बारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिळक रोडवर फिर्यादी यांच्याकडे जीओ स्टोअर आहे. कंपनीच्या अधिपत्याखाली असलेल्या या मोबाईल शॉपीचे शटर उचकटून चोरट्यांनी 2 लाख 9 हजार रूपयांची रोकड, महागडे मोबाईल असा 33 लाख 31 हजार रूपयांचा ऐवज लंपास करत पोबारा केला.

दिवसभरातील कमाई फिर्यादी यांनी दुकानातच ठेवली होती. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले. दीड वाजेच्या सुमारास आलेल्या चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने शटर उचकटून चोरी केली.

दरम्यान जीओ कंपनी स्टोअर शेजारीच आणखी दोन मोबाईल शॉपी आहेत. चोरट्यांनी जीओसह इतर दोन मोबाईल शॉपीच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. त्यानंतर दुकानाचे शटर उचकटले. कॅमेर्याची वायरिंग तोडण्यापूर्वी चोरटे कारमधून आल्याचे दिसते. कारमध्ये तिघे असून एक आतमध्येच बसला तर दोघे बाहेर येवून शटर तोडत असल्याचे दिसते आहे. शहरात वाढत्या चोरीच्या घटनामुळे शहर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.