नगर शहरासह परिसरात जोरदार गारपिट

नगरसह मध्यम महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचे
नगर शहरासह परिसरात जोरदार गारपिट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शनिवारी दुपारी दोन ते चार या वेळेत नगर शहर, उपनगर आणि शहरा लगत असणार्‍या गावात सुमारे अर्धातास जोरदार गारपिट झाली. शहरातील दिल्लीगेट, नालेगाव यासह भिंगार, सावेडी आणि नगर शहरा लगत असणार्‍या गावात देखील गारांचा जोरदार पाऊस झाला. नगर शहराच्या मध्यवर्ती भागात गारापिटीचे प्रमाण सर्वाधिक होते. अचानक झालेल्या गारपिटीमुळे नगरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. रात्री उशीरापर्यंत नगर आणि परिसरात पावसाचे वातावरण होते.

दरम्यान, उत्तर भारतात तयार झालेल्या चक्रवाताच्या दोन प्रणाली तसेच दक्षिण तामिळनाडूपासून उत्तर कोकणापर्यंत तयार झालेल्या द्रोणीय रेषेमुळे सध्या देशाच्या 80 टक्के भागात अवकाळी पावसाची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे सोसाट्याचा वारा, मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. देशाच्या अनेक भागात भागात गारपीटही होत असून, राज्यातही अशी स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस कायम राहणार आहे.

हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, पश्चिम अफगाणिस्तानातून जम्मू-काश्मीरच्या प्रदेशात एक कमी दाबाची प्रणाली उत्तरेकडे सरकत आहे. त्याचवेळी दक्षिण पश्चिम राजस्थान व कच्छच्या भागात हवेच्या वरच्या स्तरामध्ये चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. तसेच ईशान्य राजस्थानातही चक्रवात तयार झाले आहे. दक्षिण तामिळनाडूपासून उत्तर कोकणापर्यंत एक द्रोणीय रेषा (कमी दाबाचा पट्टा) तयार झाला आहे.

परिणामी बंगालच्या उपसागरावरून मध्य व दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात आर्द्रता आणली जात आहे. परिणामी हा अवकाळी पाऊस होत आहे. आज रविवारी राज्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात सोमवारपर्यंत सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

दुसरीकडे काल दुपारी नगर शहर आणि परिसारात अचानक आभाळ भरून आले. दुपारी दोनच्या सुमारास दिल्लीगेटपासून पुढे पुणे बसस्थानक, केडगाव, भिंगारकडून जोरदार मुसळधार गारपिटीला सुरूवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात गारांचे प्रमाण अधिक होती. साधारणपणे अर्धातास तुफान गारा बसत होता. अनेक भागात गारांचा खच पडला होता. नगरकरांनी या गारांचा आनंद घेतला.

काही हौशींनी तर बदलीत गारा साचवल्या. त्यानंतर पुन्हा दुपारी चारच्या सुमारास एमआयडीसी, निंबळक, सावेडी, केडगाव, उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर सायंकाळी पाचनंतर लख्ख उन पडले होते. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास पुन्हा आभाळ भरून आले होते. तर आकाशात ढगांचा गडगडाट सुरू होता. अवकाळी पावसामुळे आता शेतकर्‍यांसोबत सर्वसामान्यांचे हाल सुरू झाले आहेत. गारपिटीनंतर नगर शहरात कमालीचा गारवा वाढला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com