दोन गटाच्या वादातून तोडफोड व जाळपोळ

ठिकठिकाणी दगडफेक || नगर शहरात तणावपूर्ण शांतता
दोन गटाच्या वादातून तोडफोड व जाळपोळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar Highway) गजराजनगर जवळ दोन समाजाच्या गटात मंगळवारी सायंकाळी उशिरा मोठा वाद (Dispute) झाला. या वादाचे रूपांतर तोडफोड व जाळपोळीमध्ये (Vandalism and Arson) झाले. त्यानंतर इंद्रायणी हॉटेलजवळ हाणामारी, तर मुकुंदनगरजवळ महामार्गावर तुफान दगडफेक होऊन अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.

या घटनेमुळे शहर व उपनगर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, स्वतः पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गजराजनगर परिसरात झेंडे लावण्यात आले होते. त्यावरून दोन समाजाच्या गटात काहीसा तणाव निर्माण झाला होता. यातूनच मंगळवारी सायंकाळी उशिरा एका युवकास मारहाण करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या गटाच्या युवकांना मारहाण (Beating) करण्यात आली. अवघ्या काही क्षणातच या वादाचे तीव्र पडसाद उमटले. जमावाने दोन वाहने जाळली. तर एका वाहनाची तोडफोड (Vehicle Vandalism) करण्यात आली.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जमावाला पांगवले. हा वाद (Dispute) सुरू असतानाच इंद्रायणी हॉटेलजवळ एका युवकास गंभीर मारहाण (Beating) करण्यात आली. त्यानंतर काही क्षणातच छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गावर मुकुंदनगर जवळ मोठा जमाव जमा झाला. या जमावाने महामार्गावरील ट्रक व इतर वाहनांवर तुफान दगडफेक केली. त्यानंतर तोफखाना पोलिसांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात झाला.

पोलिस अधीक्षक राकेश ओला स्वतः पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते. या सर्व घटनेत दोन दुचाकी जाळण्यात आल्या. तर एका चारचाकीची तोडफोड करण्यात आली. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. मुकुंदनगरजवळ झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.

या घटनेची वार्ता संपूर्ण शहरात पसरतात ठिकठिकाणी जमाव जमला होता. मध्य शहर व सावेडी उपनगर परिसरात काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू होता. त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. पोलिसांकडून रात्री उशिरा या घटनेतील आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com