अहमदनगर (प्रतिनिधी) -

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अहमदनगर

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.

आ.नाना पटोले यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या मॅरेथॉन आढावा बैठकांचे सत्र सुरू केले आहे. पुढील आठवड्यात गुरुवारी (दि.18) सकाळी 10 वाजता मुंबईच्या गांधी भवन या पक्ष कार्यालयामध्ये अहमदनगर शहर जिल्ह्याची आढावा बैठक आ.नाना पटोले, ना.बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ. लहू कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.

याबाबत माहिती देताना किरण काळे म्हणाले की, पक्ष नेतृत्वाने माझ्यावर शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविल्या पासून मागील पाच-सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये शहरामधील पक्ष संघटनेतील मरगळ दूर करण्यासाठी अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले. कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद सर्व कार्यक्रमांना राहिलेला आहे.

शहर जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी देखील गठीत करण्यात आली आहे. मुंबईतील बैठकीमध्ये पक्षनेते आढावा घेणार असून संघटनात्मक बाबींवर तसेच पक्षाच्या शहरातील पुढील वाटचाली वर सखोल चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी, ब्लॉक काँग्रेस कमिटी पदाधिकारी, शहर जिल्हा काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष, पक्षाच्या विविध आघाड्यांचे अध्यक्ष, विविध विभाग, सेल यांचे प्रमुख, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी, पक्षाचे नगरसेवक यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

मुंबईत ठरणार राजकीय रणनीती

मुंबईतील बैठकीमध्ये पक्षाच्या शहरातील संघटनात्मक बांधणीची तसेच पक्ष विस्तारा बाबतची राजकीय रणनीती राज्याच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ठरणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नगर शहरामध्ये काँग्रेस सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे असे यापूर्वीच जाहीर केले आहे. यामुळे मुंबईतील बैठकीमध्ये काँग्रेस शहरात आपल्या पक्ष विस्तारासाठी नेमकी काय रणनीती आखते याकडे शहराचे लक्ष लागले आहे.