
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर शहरासह ग्रामीण भागात सध्या व्हायरल आणि तापाचे रुग्ण वाढतांना दिसत आहे. दवाखाने, हॉस्पिटल तापाच्या रुग्णांने भरली असून त्यातल्या त्यात डेंग्यूने डोके वर काढले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आकडेवारीनूसार जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत 150 जणांचा डेंग्यूचा शासकीय प्रयोग शाळेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
एकीकडे विघ्नहर्त्याच्या आगमनाला घेऊन उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र डेंग्यूने चिंता वाढली आहे. मागील काही महिन्यांत नगर जिल्ह्यात 150 रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याची नोंद झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात नगरकर तापाने फणफणले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होतांना आहे.एडीस इजिप्ती प्रजातीच्या डासाच्या मादीद्वारे डेंग्यूचा संसर्ग पसरतो. हे डास चिकनगुनिया, पिवळा ताप आणि झिका विषाणूच्या संक्रमणास देखील कारणीभूत ठरतात. डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अॅण्टीबायोटिक किंवा अॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. यामुळे वेळीच निदान गरजेचे आहे. जिल्ह्यता जानेवारीपासून 18 सप्टेंबरपर्यंत 150 रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या मोठी आहे. पावसाची उघडझाप, तापमान, आर्द्रता आणि अनियोजित शहरी विकासामुळे डासांची घनता वाढल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
सध्या कधी भूरभूर पाऊस पडतो, तर उण सावलीचा खेळ सुरू आहे. ढगाळ वातावरण आणि दमट हवामान हे आजारांना कारणीभूत असून अनेक ठिकाणी डासांची उत्त्पत्ती वाढलेले दिसत आहे. यामुळे डेंग्यूचा ताप वाढलेला दिसत आहे. उघड्यावर साठलेले पाणी डबकी यासह तर अनेक ठिकाणी पाणी साठवणुकीवर भर देण्यात येत आहे. या ठिकाणी डेंग्यूसह तपास कारणीभूत डासांची निर्मिती होवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरूवातीपासून डेंग्यू पॉझिटीव्ट रुग्णांचा आलेख वाढत आहे. जून महिन्यात 28, जुलै महिन्यांत 18, ऑगस्टमध्ये 57 आणि 18 सप्टेंबरपर्यंत 24 रुग्णांचे शासकीय प्रयोग शाळेतील डेंग्यूच अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत 820 संशयतींच्या रक्तांची चाचणी केलेली असून यात 150 डेंग्यू बाधित आहेत. हा आकडा खासगी प्रयोग शाळेच्या अहवालानूसार मोठा आहे. नगर शहरातील अनेक हॉस्टिपटलमध्ये डेंग्यपिडितांवर उपचार सुरू आहेत.
मलेरिया, चिकणगुणीयाचे फारसे रुग्ण सध्या नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत मलेरियाचे 6 रुग्ण पॉझिटीव्ह असून यातील दोघे जिल्ह्यातील आहेत, तर चौघे परजिल्ह्यातील आहेत. तर अवघ्या एका रुग्णाचा चिकणगुणीचा अहवाल पाझिटीव्ह आहे.
जिल्ह्यात तापाचे रुग्ण समोर येत आहे. विशेष करून काहींना डेंग्यू झाल्याचे निदान झालेले आहे. डासांमुळे मलेरिया, डेंग्यू होत असून नागरिकांनी घरात साठवलेले पाणी, घर परिसारात साठलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होणार याची दक्षता घ्यावी. तसेच ताप आल्यास जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेची संपर्क साधावा.
- डॉ. नितीन नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी
महिनानिहाय डेंग्यूचे रुग्ण
जानेवारी 4, फेबु्रवारी 2, एप्रिल शुन्य, मे 17, जून 28, जुलै 18, ऑगस्ट 57 आणि सप्टेंबर 24 यांचा समावेश आहे.