मोबाईल टॉवर विरोधात नागरिकांचा रास्तारोको

पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात
मोबाईल टॉवर विरोधात नागरिकांचा रास्तारोको

अहमदनगर (प्रतिनिधी)

शहरातील धर्माधिकारी मळा येथे उभारण्यात येत असलेल्या फाईव्ह जी मोबाईल टॉवरचे काम त्वरीत बंद करण्यासाठी संतप्त नागरिकांनी रविवारी नगर-मनमाड रस्त्यावर प्रेमदान चौकात रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादुर प्रजापती, डॉ. अजित बोरा, यशवंत शिंदे, विठ्ठल सुरम, गंगाधर नजन, संध्या पवार, शिल्पा कुलथे, ललीता गवळी, रिंकू दांगट, वसुधा शिंदे, माधवी दांगट, लता बोरा आदींसह धर्माधिकारी मळा परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

एप्रिलमध्ये धर्माधिकारी मळा परिसरात अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते. आरोग्यावर दुष्परिणाम होण्याच्या भितीने स्थानिक नागरिकांनी मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध दर्शविला होता. महापालिका प्रशासनाने सदर काम तात्पुरत्या स्वरूपात बंद पाडले. मात्र संबंधित जागा मालकाने महापालिकेतील अधिकाऱ्यांशी आर्थिक तडजोड करून सदरचे काम सुरू केले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

फाईव्ह जी मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे पाचशे मीटर अंतरावरील नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याने स्थानिक नागरिकांचा या टॉवरला विरोध आहे. अॅड. गवळी म्हणाले की, मोबाईल कंपनीकडून मोठ्या प्रमाणात भाडे व आगाऊ रक्कम मिळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता जागा मालक टॉवर उभारत आहे. फाईव्ह जी मोबाईल टॉवरमुळे कर्करोग होण्याचा धोका असून, लहान मुलांच्या आरोग्यावर देखील त्याचे गंभीर परिणाम होतात. तर पशु-पक्ष्यांना देखील याचे दुष्परिणाम होत असल्याचे संशोधनाने सिध्द झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com