जिल्हा नामांतरावरून खा. विखेंचा सरकारला इशारा म्हणाले...

विभाजनासही विरोध || आ. जगताप यांची विभाजनावर 'ही' भुमिका
खा. डॉ. सुजय विखे
खा. डॉ. सुजय विखे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरच्या नामांतराचा निर्णय घेताना नगरकरांचे मत विचारात घेणे आवश्यक आहे. ते जोपर्यंत काही मत देत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने नामांतराची प्रक्रिया सुरू करू नये आणि त्यांचे मत नगरकरांवर लादू नये. नामांतराची ही नगरमधून मागणी झालेली नाही. जिल्ह्याबाहेरून कोणी मत व्यक्त केले म्हणून निर्णय घेतला तर त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटतील, असा घरचा आहेर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी देतानाच नामांतराला विरोध असल्याचेही अप्रत्यक्षपणे सूचित केले.

भाजपचे आ. गोपीचंद पडळकर व भाजपचे परभणी जिल्ह्यातील अध्यक्ष सुरेश भुमरे यांनी राज्य सरकार व नगरच्या महापालिकेला पत्र लिहून नगरचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ असे करावे अशी मागणी केली आहे. त्यानुसार मनपा प्रशासने महासभेच्या मान्यतेसाठी तसा प्रस्तावही तयार केला आहे. याशिवाय नागपूर विधिमंडळाच्या अधिवेशनातही आ. पडळकर यांनी ही मागणी केली.

त्यावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत उत्तर देताना या मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल तसेच स्थानिक पातळीवर महापालिकेकडून ठराव मागितल्याचे, रेल्वे व टपाल विभागाचीही ना हरकत मागवल्याची माहिती दिली.

या पार्श्वभूमीवर भाजपचेच खा. विखे यांनी नगरमध्ये माध्यमांशी बोलताना वरील इशारा देत घरचा आहेर दिला आहे. नगरच्या नामांतरामुळे जिल्ह्याचा दुष्काळ मिटणार आहे की पाणी मिळणार आहे, असा प्रश्नही खा. यांनी विखे यांनी उपस्थित केला. नगरचे नगरसेवक महापालिकेच्या सभेत आपले मत व्यक्त करतील. शहराच्या लोकप्रतिनिधींचे मतही विचारात घेतले जावे. हा निर्णय स्थानिक पातळीवर व्हावा. राज्य सरकारने हा निर्णय ठरवू नये, नगरकरांवर लादू नये. ही मागणी नगरमधून झालेली नाही. नगरचे नामांतर हे एका पक्षाचे धोरण असू शकत नाही. यासंदर्भात सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनाही विचारात घ्यावे लागेल. जिल्ह्याबाहेरून कोणी मत व्यक्त केले आणि तसा निर्णय घेतल्यास त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटतील, असेही खासदार विखे यांनी स्पष्ट केले.

विभाजनाने दक्षिणेला काय फायदा होणार हे पटवून द्या

यावेळी खा. डॉ. विखे यांनी नगरच्या जिल्हा विभाजनाला स्पष्टपणे विरोध केला. ज्यांच्याकडे व्हिजन नाही ते विभाजनाची मागणी करतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने गेल्या अडीच वर्षात (महाविकास आघाडी काळात) हा निर्णय का घेतला गेला नाही? ज्यांच्यावर मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी होती, त्यांनी ती पार का पाडली नाही? जिल्हा विभाजन हे केवळ ठराविक लोकप्रतिनिधींच्याच मनात आहे. विभाजन जिल्हा विभाजन हे भावी पिढीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकत्रित ताकद कमी होईल. ज्यांना आमची अडचण वाटते ते विभाजनाची मागणी करतात. परंतु आम्ही येथे कोणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आलेलो नाही. ज्यांना राजकीय स्वायत्तता हवी, त्यातून मनमानी कारभार करता यावी, अशी इच्छा आहे असेच लोक विभाजनाची मागणी करतात, असा टोला खा. विखे यांनी लगावला. जिल्हा विभाजनाने प्रत्येक भागाचा विकास होईल, दक्षिण जिल्ह्याला फायदा होईल? त्यासाठी काही आराखडा तयार आहे, तयार असल्यास तो जनतेसमोर माडून त्यांना पटवून द्या. नगर जिल्हा संवेदनशील जिल्हा असून नेहमी राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत राहणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यात विष कालवण्याचा प्रयत्न करू नका असा थेट इशाराच खा. विखे यांनी दिला आहे.

जिल्हा विभाजन व्हावे : आ. जगताप

अहमदनगरच्या नामांतरास आमचा कुठलाही विरोध नाही. पण कोणते नाव द्यायचे, याची मतमतांतरे आहेत. कोणी आनंदनगर नाव द्या म्हणते तर कोणी अंबिकानगर करा, अहिल्यादेवीनगर करा म्हणते. यावर चर्चा सुरू राहील. पण आमची पहिली मागणी आहे ती जिल्हा विभाजन करण्याची. त्यासाठी पुढाकार घेतला जावा व जिल्हा विभाजन पहिले केले जावे, अशी मागणी नगर शहराचे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com