निकाल लागताच आघाडीत आदळआपट

काँग्रेसचा आरोप | प्रभारी शहरप्रमुखाच्या आडमुठेपणाची किंमत मोजली
निकाल लागताच आघाडीत आदळआपट
महाविकास आघाडी

अहमदनगर (प्रतिनिधी)

पोटनिवडणुकीचा निकाल लागताच स्थानिक पातळीवर एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी आदळआपट सुरू केली आहे.

पराभव केवळ प्रभारी शिवसेना शहरप्रमुखांच्या आडमुठेपणामुळे झाला असून त्याची किंमत मात्र महाविकास आघाडीला मोजावी लागली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या विचाराप्रमाणे प्रभारी शहर प्रमुखांनी निर्णय घेतले असते ही वेळ आली नसती, असे शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अनंतराव गारदे यांनी म्हटले आहे.

निवडणूक प्रक्रियेपासून काँग्रेस अलिप्त होती. आज निकालानंतर आपले मौन सोडत थेट सेनेच्या प्रभारी शहर प्रमुखावर निशाणा साधला. गारदे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मुळात हा प्रभाग काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या प्रभागात काँग्रेसचे दोन विद्यमान नगरसेवक आहेत. काँग्रेसची ओरिजिनल व्होट बँक आहे. या प्रभागात काँग्रेसचाच उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आम्ही शिवसेनेसमोर ठेवला होता. शिवसेनेची या ठिकाणी जागा सोडण्याची काँग्रेसकडे मागणी होती. यासाठी शिवसेना काँग्रेसच्या शहरातील तसेच राज्याच्या नेत्यांना सातत्याने गळ घालत होती.

स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या निधनानंतर होणारी ही शहरातली पहिलीच पोटनिवडणूक होती. यामुळे मनाचा मोठेपणा दाखवून काँग्रेसने ही जागा शिवसेनेला सोडली. मात्र प्रभारी शहर प्रमुखांनी काँग्रेसचा हात सोडत केवळ राष्ट्रवादीला बरोबर घेत उमेदवारी अर्ज दाखल केला. एवढंच नाही तर प्रचार पत्रिक छापताना जाणीवपूर्वक काँग्रेस नेत्यांचा अवमान करण्यात आला. त्यानंतर देखील काँग्रेसची प्रचारात उतरण्याची व आपली ताकद महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे उभी करण्याची खुल्या दिलाने तयारी होती. मात्र पुन्हा एकदा स्व. अनिलभैय्या यांनी राष्ट्रवादीच्या ज्या नेत्याच्या दहशतीच्या प्रवृत्ती विरोधात आयुष्यभर भूमिका घेतली त्याला हरताळ फासत त्यांच्याच हस्ते प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसला एकदा देखील प्रचारासाठीचा निरोप देण्यात आला नाही, खुलासा काँग्रेसने केला आहे.

दरम्यान, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी शहरातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com