
खैरी निमगाव (वार्ताहर)
बाजारात एखाद्या वस्तूची आवक वाढल्यास त्या वस्तूचे भाव घसरतात व आवक कमी झाल्यास दर वाढतात, हा अर्थशास्त्राचा नियम असून, आजही तो तसाच शाळा, महाविद्यालयातून शिकविला जातो. परंतू सध्या कापसाच्या किंमतीबाबत मात्र हा नियम खोटा ठरत आहे.
राज्यात सर्वत्र कापसाच्या जीनींगमध्ये व्यापार्यांनी कापसाची खरेदी सुरू केली आहे. पण दीड महिन्याचा काळ लोटला तरी कापसाची आवक नगण्य आहे. सुरूवातीला कापसाला 9 हजाराच्या वर भाव मिळाला. कापूस उत्पादकांना भाव लवकरच 10 हजार होईल, ही अशी होती. परंतू भाव दररोज कमी कमी होत जाऊन आज 8 हजार 500 वर थांबला आहे.
वास्तविक शेतकर्यांच्या घरी फार कापूस नाही व तो साठवून ठेवण्याची सर्वसामान्य शेतकर्यांची आर्थिक क्षमतादेखील नाही तसेच यावर्षी अतिवृष्टीने बर्याच जमिनीवरील कापसाचे पीक खराब झाल्याने कापसाचा पेरा कमी झाला. ज्या जमिनीवर पीक उभे आहे तेदेखील लाल पडले. त्यावर चिकटा आल्याने उत्पन्नात मोठी घट येत आहे.
यंदा कापसाची आवक मंदावली आहे, कापुस पिकाबाबत शेतकर्यांत नैराश्याचे वातावरण असुन बाजारात आवक नाही. मात्र तरी देखील भाव नाही. शेतकर्यांच्या घरी कापूस साठवून ठेवलेला नाही, शेतात कापूस पिकेल, अशी शक्यता नाही. तरीही कापसाचे भाव दररोज कमी होत आहेत. ही बाब सामान्य शेतकरी तर सोडाच पण जाणकार शेतकर्यांसह अभ्यासू व्यापार्यांनादेखील अनाकलनीय आहे. त्यामुळे यावर्षी बाजारात आवक वाढल्यास भाव कमी व आवक कमी झाल्यास भाव जास्त या अर्थशास्त्रीय नियमाला तडा जात आहे. यामुळे शेतकरी निराश व उदासीन आहे, हे मात्र खरे.