नगर जिल्हा सहकारी बँकेवर भाजपचा झेंडा
अहमदनगर (प्रतिनिधी) :
आशिया खंडातील अग्रणी आणि जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाची अर्थदूत मानली जाणारी जिल्हा बँक (Ahmednagar District Central Cooperative Bank) भाजपच्या ताब्यात गेली आहे. आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना अवघ्या एका मताने पराभवाचा धक्का दिला.
बँकेच्या संचालक मंडळात राष्ट्रवादी, काँग्रेस व सेनेचे स्पष्ट बहुमत असताना भाजपने बाजी मारली. जिल्हा बँकेतील अजित पवार व बाळासाहेब थोरात यांच्या वर्चस्वाला भाजपने सुरूंग लावला. संचालकांना अध्यक्षपदाचा उमेदवार निवडताना विश्वासात न घेतल्याने आघाडीवर पराभवाची नामुष्की ओढावली आहे.
तत्कालीन अध्यक्ष उदय शेळके यांच्या अकाली निधनामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. या पदासाठी आज निवडणूक झाली. बँकेच्या 21 संचालकांपैकी राष्ट्रवादीचे 10, काँग्रेसचे 4, भाजपचे 6 तर एक संचालक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत. आज झालेल्या निवडणुकीत आघाडीचे घुले तर भाजपचे कर्डिले यांनी अर्ज दाखल केला. कर्डिलेंच्या उमेदवारीमुळे आधीच राजकीय शंकेची पाल चुकचुकली होती. अखेर मतदान झाले. त्यात कर्डिलेंना 10 तर घुलेंना 9 मते मिळाली. एक मत बाद झाल्याने अध्यक्षपदाची शर्यत कर्डिले यांनी जिंकली.
जिल्हा बँकेच्या राजकारणात उलटफेर होणार, अशी शंका आधीपासूनच चर्चेत होती. राष्ट्रवादीतील स्पर्धा भाजपच्या पथ्यावर पडणार, ही शक्यता खरी ठरली आहे. आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे घुले, माजी अध्यक्ष सीताराम गायकर आणि श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप इच्छुक होते. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल बैठक घेतल्यानंतर घुले यांचे नाव पुढे केले. घुलेंच्या उमेदवारीस पक्षातच विरोध होता. हीच नाराजी बँकेवरील राष्ट्रवादीच्या वर्चस्वास सुरूंग लावण्यास कारणीभूत ठरली.
भाजपचे संचालक दोन दिवसांपूर्वी सावध भुमिकेत होते. मंगळवारी अजित पवार यांनी संचालकांची बैठक घेतली. बैकठीला माजी मंत्री थोरात उपस्थित होते. मात्र या बैठकीत अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करताना भाजपसह अन्य गटाच्या संचालकांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे भाजपच्या संचालकांनी काल रात्री 8 वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्हिडिओ संवाद साधला. या बैठकीत फडणवीस यांनी कोणत्याही स्थितीत बँक भाजपच्या ताब्यात आली पाहिजे, अशा सूचना दिल्या. त्यानुसार राष्ट्रवादीतील नाराजीचा फायदा घेत भाजपने पवार आणि थोरातांना धक्का दिला.
सत्तेची पदे केवळ घुले परिवारालाच दिली जातात, यावरून राष्ट्रवादीत नाराजी होती. घुले परिवाराला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले होते. आगामी विधान परिषदेसाठी चंद्रशेखर घुले यांचे नाव चर्चेत आहे. त्यात आता जिल्हा बँकेचे अध्यक्षपदही त्यांना देण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीत प्रचंड नाराजी उमटली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील 5 संचालकांच्या गटाने पक्षाच्या या धोरणाला धक्का देण्याचा निर्णय घेतला होता, अशी चर्चा आहे.
आघाडीच्या नेत्यांना जागा दाखवली - खा.विखे
जिल्हा बँकेत राजकारणात आणायचे नाही, ही आजवरची परंपरा आहे. मात्र ही परंपरा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षीय चुल मांडत मोडली. त्यामुळे पक्ष म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने बँक ताब्यात घेवून आघाडीच्या नेत्यांना जागा दाखवली आहे, अशी प्रतिक्रीया भाजपचे खा.सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. कर्डिले यांच्या विजयानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली. मोजके संचालक वगळता बँकेतील अन्य गटाच्या संचालकांना गृहित धरण्याच्या धोरणावर खा.विखेंनी बोट ठेवले.
कर्डिले तीन वर्षे पद सोडत नाहीत
अध्यक्षपदाची निवड झाली असून उपाध्यक्षपदासाठी नव्याने निवड होणार का? याबाबत नतून अध्यक्ष कर्डिले यांच्याकडे विचारणा केली असता, याबाबत नेते मंडळी निर्णय घेतील, असे सांगत वेळ मारून नेली. तर दुसरीकडे पुढील तीन वर्षे कर्डिले आता अध्यक्षपद सोडत नाही, हे आता तीन वर्षे हटणार नाही, असे खा. डॉ. विखे म्हणताच एकच हश्या पिकला. दुसरीकडे बँकेच्या राजकारणात कधी काय घडवायचे ही विखे कुटुंबाची ख्याती असल्याचे नूतन अध्यक्ष कर्डिले म्हणताच पुन्हा खसखस पिकली.