दुचाकी चोरीच्या तपासाबाबत शहर पोलीस उदासीन
सार्वमत

दुचाकी चोरीच्या तपासाबाबत शहर पोलीस उदासीन

करोना संसर्गात चोरट्यांचे फावले : नागरिकांमध्ये नाराजी

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर व उपनगरात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना दररोजच घडत आहेत. करोना महामारी पूर्वी देखील शहरासह उपनगरांतून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. दरम्यान करोना संकट आले. लॉकडाऊनमुळे शहरातील गुन्हेगारीमध्ये काहीशी घट झाली. यात दुचाकी चोरीच्या काही प्रमाणात घटना घटल्या होत्या.

परंतु, लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने मे महिन्यापासून शहरातील दुचाकी चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दररोज दोन-तीन दुचाकी चोरीला जात आहेत. करोना बंदोबस्ताचा ताण असलेल्या शहर पोलिसांना दुचाकी चोर्‍या रोखण्यात अपयश आले आहे. यामुळे पोलिसांच्यादृष्टीने किरकोळ तपास असणार्‍या दुचाकी चोरीच्या तपासाबाबत शहर पोलीस उदासिनता आहे.

दुचाकी सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे साधन असून एक दुचाकी घेण्यासाठी 70 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. सर्वसामान्य लोक बचत करून, कर्ज काढून किंवा हप्त्यावर दुचाकी खरेदी करतात. अलिकडच्या काळात दुचाकीच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दुचाकी चोरीला गेल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला तर चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध लागेलच याची शक्यता सर्वसामन्यांना नसते.

चोरी गेलेल्या दुचाकी चोर सुट्टे पार्ट करून त्याची विक्री करतात. काही दुचाकी गैरकामासाठी पण वापरल्या जातात. भाजी खरेदीसाठी गेले तर दुचाकी चोरीला गेली, बँकेसमोर दुचाकी पार्क केलेली दुचाकी काही वेळातच चोरीला गेली, घराच्या समोर उभी केलेली दुचाकी रात्रीतून चोरीला गेली अशा घटना सध्या शहरामध्ये दररोज घडत आहेत.

दुचाकी चोरी करणार्‍या ठराविक टोळ्या शहरामध्ये सक्रिय असण्याची शक्यता आहे. या टोळ्या पाळत ठेऊन, अंदाज बांधून दुचाकी चोरीत असल्याचा अंदाज आहे. शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार तसेच एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. दुचाकी चोरीला गेल्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्याचे काम पोलीस करतात.

तपास मात्र करत नसल्याचे लक्षात आले आहे. चोरीला गेलेल्या दुचाकी सापडण्याचे प्रमाण फारच कमी आहे. यापूर्वी कोतवाली, तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी काही दुचाकी चोरट्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून काही प्रमाणात चोरीच्या दुचाकी हस्तगतही केल्या. परंतु, अटक केलेल्या चोरट्यांकडून दुचाकी चोरीच्या रॅकेटबाबत पोलिसांना माहिती मिळाली नाही.

शहरासह, उपनगरात आजही दिवसा व रात्री दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. शहर पोलिसांनी वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनेचा अभ्यास करून योग्य नियोजन करून कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. मुळात कमी कर्मचारी, करोना बंदोबस्त, मोठ्या गुन्ह्यांचा तपास, इतर कामे, काही कर्मचारी करोना पॉझिटिव्ह यामुळे दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी शहर पोलिसांकडे वेळच नसल्याचे एकंदरित चित्र आहे.

मार्केटयार्ड येथील एका हॉटेलच्या समोरून व स्टेट बँक चौकातून दोन दुचाकींंची चोरी झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. लक्ष्मीकांत शर्मा (रा. सारसनगर, नगर) यांची विना नंबरची दुचाकी मार्केटयार्ड येथील एका हॉटेलच्या बाहेर उभी केली होती. चोरट्यांनी ती लंपास केली. ही घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी शर्मा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी चोरीची दुसरी घटना स्टेट बँक चौकात दिवसा घडली. अविनाश बाळासाहेब सांगळे (रा. कानडे मळा, नगर) यांची दुचाकी (क्र. एमएच 16 एक्यु 7524) सोमवारी सकाळी साडेबाराच्या दरम्यान चोरीला गेली. या दुचाकीची चोरी केवळ 15 मिनिटांमध्ये करण्यात आली. याप्रकरणी सांगळे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com