अहमदनगर (प्रतिनिधी) - भिंगारमधील मोमीन गल्लीच्या काटवनात झालेला मृत्यू हा विषारी दारू पिल्याने झाल्याचा रिपोर्ट वैद्यकीय अधिकार्यांनी दिला आहे. त्यानंतर पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तब्बल चार वर्षानंतर हा प्रकार भिंगार पोलिसांनी उघडकीस आणला.

रमेश ऊर्फ रमाकांत खबरचंद काळे (रा. द्वारकाधीश कॉलनी, आलमगिर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांतर्फे पीएसआय भैय्यासाहेब देशमुख यांनी फिर्यादी होत हा गुन्हा दाखल केला आहे. जावेद रौफ शेख (रा. मोमीन गल्ली) व त्याचे तीन साथीदार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

‘माझी बकरी मेली आहे. ती तुम्हाला देतो’ असे सांगून मोमीन गल्लीतील जावेद रौफ शेख याने रमेश ऊर्फ रमाकांत खबरचंद काळे व त्याची पत्नी वंदना (रा. द्वारकाधीश कॉलनी, आलमगिर) या दोघांना मोटारसायकलवर बसून काटवनात नेले. तेथे रमेश काळे यास बळजबरीने दारू पाजली. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर रमेश काळे यास सिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. भिंगार पोलिसांत 22 फेबु्रवारी 2017 रोजी अकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अनेक दिवस तपासावर असलेल्या अकस्मात मृत्यूसंदर्भात पोलिसांनी पुन्हा पीएम करणार्या वैद्यकीय अधिकार्यांचा रिपोर्ट मागविला. वैद्यकीय अधिकार्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृतास झालेल्या मारहाणीत मार लागल्याने तसेच दारूमध्ये विषाचे अंश आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. त्यात ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी स्वत:च फिर्याद होत खुनाचा गुन्हा दाखल केला. भिंगारचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील हे अधिक तपास करत आहेत.

जावेद शेखसह चौघे आरोपी

पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख यांनी फिर्याद होत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जावेद रौफ शेख (रा. मोमीन गल्ली, भिंगार) याला अटक केली आहे. शेख व त्यांच्या इतर तीन साथीदारांनी हा खुन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मोमीन गल्लीतील काटवनात 22 फेबु्रवारी 2017 रोजी ही घटना घडली होती. आज सोमवारी पोलिसांनी नव्याने 302 कलमान्वये गुन्हा नोंदविला.

मृत रमेश काळे यांच्यावरही चोरी, खूनासारखे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केल्यानंतरच आरोपीच्या अटकेचा निर्णय घेतला जाईल. सबळ पुरावे हाती आल्यानंतर कायदेशीर निर्णय घेतला जाईल. - प्रवीण पाटील, तपासी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक, भिंगार.