अहमदनगर (प्रतिनिधी) - रमेश काळे खून प्रकरणात फरार असलेल्या भिंगारच्या जावेद शेखला एलसीबी पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी भिंगार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रमेश ऊर्फ रमाकांत खबरचंद काळे याला मेलेली बकरी देतो असे सांगत मोमीन गल्ली परिसरातील काटवनात नेण्यात आले. 21 फेब्रुवारी 2017 रोजी विषारी औषध पाजून त्याला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. गत महिन्यात भिंगार पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यात जावेद शेख हा मुख्य आरोपी असल्याचे समोर आल्यानंतर तो पसार झाला होता. त्याच्या अटकेसाठी एलसीबीचे पीआय अनिल कटके यांनी स्वतंत्र पोलीस पथक नेमले होते. या पथकाला तो मुंबईत असल्याची माहिती मिळाली.

ठाणे येथील राबोडीमधील नातेवाईकाकडे तो राहत असल्याची पक्की खबर मिळताच त्या घरावर छापा टाकत जावेद रौफ शेख याच्या मुसक्या एलसीबी पोलिसांनी आवळल्या. त्याला पुढील तपासासाठी भिंगार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हवालदार भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, ज्ञानेश्वर शिंदे, विशाल दळवी, शंकर चौधरी, संदीप दरंदले, योगेश सातपुते, संभाजी कोतकर यांच्या पथकाने जावेदला अटक केली.