नगर-आष्टी मार्गावर धावली हायस्पीड रेल्वे

नगर-आष्टी मार्गावर धावली हायस्पीड रेल्वे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर आणि मराठवाड्याच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाच्या अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतरावर काल बुधवारी हायस्पीड रेल्वे (ताशी 144 किलोमीटर) बारा डब्यांसह धावली. दुपारी 2 वाजता सदरील रेल्वे कडा येथून आष्टी येथे आली. तर दुपारी 4 वाजता आष्टी रेल्वे स्थानकावर बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये स्वागत करण्यात आले.

त्यामुळे आता हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अहमदनगर-ते आष्टी हायस्पीड रेल्वे धावणार आहे.यापूर्वी 17 मार्च 2018 रोजी नगर ते नारायणडोह दरम्यान सात किलोमीटरवर सात डब्यांच्या रेल्वेची चाचणी घेण्यात आली. 25 फेब्रुवारी 2019 रोजी नारायणडोह ते सोलापूरवाडी या 15 किलोमीटर अंतरावर सात डब्यांची रेल्वे चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर 9 डिसेंबर 2021 रोजी दोन डब्यांच्या रेल्वेची चाचणी आष्टीपर्यंत घेण्यात आली होती. आता बारा डब्यांची हायस्पीड रेल्वे धावली आहे. ही रेल्वे पाहण्यासाठी सोलापूरवाडी, धानोरा, कडा, आष्टी या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती.

बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच रेल्वे आल्यानं, हे चित्र डोळ्यात साठविण्यासाठी सोलापूरवाडी, धानोरा, कडा, आष्टी येथे लहान चिमुकल्यांसह स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. रेल्वे इंजीन डब्यांना जोडल्यानंतर स्थानिकांनी रेल्वेला हार आणि फुलं उधळून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन केलं. लवकरच या मार्गावर प्रत्यक्षात रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही डॉ. प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.

गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न साकार झालं- फडणवीस आमचे नेते मा. गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे स्वप्न पूर्ण होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पंकजाताई आणि प्रीतमताई तुम्ही केलेल्या पाठपुराव्याबद्दल अभिनंदन ! आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार, असं ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com