‘सिव्हील’च्या गेटवर भाईगिरी

सिव्हील सर्जनसह कर्मचार्‍यांना शिव्यांची लाखोली
‘सिव्हील’च्या गेटवर भाईगिरी

अहमदनगर (प्रतिनिधी) -

सिव्हीलचे गेट बंद केल्यानंतर नातेवाईक रुग्णाला भेटू दिले जात नाही. या कारणावरून गेटवर हमरी-तुमरी सुरू आहे. पेशंटचा गळा दाबून मारता, असा आरोप करत एका रुग्णाच्या नातेवाईकाने सिव्हील सर्जनच्या नावाने शिव्याची लाखोली वाहिली.

समजावून सांगणार्‍या सिव्हीलच्या कर्मचार्‍यांना मारहाण केल्याचा प्रकार काल सोमवारी सायंकाळी घडला. अखेर हा वाद थेट पोलिसांत पोहचला अन् शिवीगाळ करणार्‍या नातेवाईकांविरोधात पोलिसांत कोवीड संसर्गाच्या काळात बेजबाबदार वर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत आनंद उजागरे (रा. मिशन कंपाऊड, कोठी) आणि संदीप उत्तम मरकड (रा. मिरी, पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

सिव्हील हॉस्पिटलच्या शवविच्छेदन विभागातील कर्मचारी सचिन शाम बैद यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. काल सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सिव्हील हॉस्पिटलच्या गेटसमोर हा प्रकार घडला.

सिव्हील हॉस्पिटलमध्ये फक्त कोरोना रुग्णांना जावू दिले जाते. त्यांच्या नातेवाईकांना आतमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे आदेश एसपी मनोज पाटील यांनी काढलेले आहेत.

काल सोमवारी सायंकाळी उजागरे, मरकड यांनी सिव्हील सर्जन सुनील पोखरणा व सतर अधिकारी, कर्मचारी यांच्याविषयी अर्वाच्च भाषेत बोलून शिवीगाळ केली. ‘तुम्हाला माझे काय करायचे ते करा, आमची अडवणूक का करतात, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुम्ही पेशंटचा गळा दाबून त्यांना मरतात. तुम्ही मला लेखी द्या, इथून पुढे मूत्यू झाल्यास त्याचे जबाबदार तुमचे हॉस्पिटल राहील, अशी अरेरावी केली. बैद यांच्यासोबत असलेल्या जाधव नावाच्या महिला कर्मचार्‍यांनाही शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार संदीप केरूळकर हे पुढील करत आहे.

पोलिसांकडून स्वतंत्र गुन्हा

याच प्रकरणात पोलिसांनीही स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अमोल ज्ञानेश्‍वर काळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यातही चंद्रकांत उजागरे व संदीप मरकड यांचा आरोपी म्हणून उल्लेख आहे. एसपींच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरीता पोलिसांचे पथक सिव्हील हॉस्पिटलच्या गेटवर नियुक्त केले आहे. हे पथक पेशंटशिवाय कोणालाही आतमध्ये जावू देत नाही. चंद्रकात उजागरे याने ‘तुम्ही नातेवाईकांना आतमध्ये सोडले नाहीतर तुमची नोकरी घालवेल. नातेवाईकांना आत जाण्यास कसे अडवतात, तुम्हाला बघूनच घेतो, अशी दमबाजी करत त्याने पेशंटच्या 25/30 नातेवाईकांना बोलावून घेतले. 4/5 पोलीस काय करणार असे म्हणत त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. ही माहिती ड्युटीवरील पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरवसे यांना कळविली. सुरवसे तत्काळ तेथे पोहचले. त्यानंतर गेटवरील जमाव पांगला. या फिर्यादीवरून पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com