आता खंडणीचं झेंगाट

बोठेच्या ताब्यासाठी तोफखाना पोलीस पारनेर कोर्टात
आता खंडणीचं झेंगाट

अहमदनगर (प्रतिनिधी) - रेखा जरे हत्याकांड, महिला विनयभंग प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर बाळ बोठेच्या मागे आता खंडणीच्या आरोपाचं झेंगाट लागलं आहे. शहरातील सरकारी कार्यालयात कंत्राटी नोकरीस असलेल्या महिलेकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात तोफखाना पोलिसांनी कोर्टाकडे त्याचा ताबा मागितला आहे.

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात 13 दिवस पोलीस कोठडीत असलेल्या बाळ बोठेला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात 1 दिवस त्याला पोलीस कोठडी मिळाली. आज त्याला कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे बोठेचा ताबा कोर्टाकडे गेला. मात्र, तोफखाना पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात त्याला वर्ग करण्याचा अर्ज दिला आहे. तोफखाना पोलीस अर्ज घेऊन पारनेर कोर्टात पोहोचले आहेत. आज सायंकाळपर्यंत बोठेला या गुन्ह्यात वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी ‘नगर टाइम्स’ला दिली.

  • 10 लाखांच्या तडजोडीचा आरोप

  • कार्यालयाची परवानगी न घेता निवडणूक लढविली. हा मुद्दा माझ्या हाती लागला असून त्यातून सहीसलामत बाहेर पडायचे असेल तर 10 लाख रुपयांची तडजोड खंडणी मागितल्याचा आरोप करत बाळ बोठेविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात शहरातील एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. नगरच्या कोर्टाने पारनेर कोर्टातून त्याला ताब्यात घेण्याची सूचना पोलिसांना केली. त्यानंतर पोलीस पारनेरकडे रवाना झाले.

  • उद्या पुन्हा कोर्टात

  • बाळ बोठेला खंडणीच्या प्रकरणात अटक केल्यानंतर उद्या नगरच्या कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस त्याच्या कोठडीची मागणी करतील. कोर्ट काय निर्णय देणार याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, बाळ बोठेने पारनेर कोर्टात अर्ज देत येरवडा किंवा नगर सबजेल न ठेवता नाशिक कारागृहात ठेवण्याची विनंती केली आहे. त्यावरही निर्णय होणे बाकी आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com