अहमदनगर (प्रतिनिधी) - आनंदधाम फौंडेशनने आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीला वर्षभरापूर्वी अन्नदानाचा नंदादीप प्रज्वलित केला. तो वर्षभरापासून अखंडपणे चालू आहे. यातूनच आनंद महिमा किती महान आहे याची प्रचिती येते. भुकेलेल्यांना सुग्रास, सकस अन्न देण्याचा हा उपक्रम मानवतेचे प्रतिक असून अशा मानवसेवेतूनच जग लवकर कोरोना महामारीतून मुक्त होईल असे शुभाशिर्वाद युवाचार्य पूज्य महेंद्रऋषीजी महाराज यांनी दिले.

पूज्य आचार्यश्रींच्या आनंद नामाचा महिमा विलक्षण आहे. त्यांच्या कृपाशिर्वादाने सुरु झालेले कोणतेही सत्कार्य अखंड अविरत चालते, असे ते म्हणाले. आनंदधाम फौंडेशनने अन्नदानाचे मोठे कार्य सुरु करीत भुकेलेल्यांना अवघ्या दहा रुपयात पोटभर जेवण देण्याचा उपक्रम आनंदधाम परिसरात चालवला आहे. या उपक्रमाची 28 मार्चला वर्षपूर्ती झालीे. आचार्यश्रींचा पुण्यस्मृतीदिन आणि होळीचे औचित्य साधून आनंदधाम फौंडेशनने सर्वांना मोफत पुरणपोळी, आमटी, भात असे जेवण आज सोमवारी उपलब्ध करून दिले. या उपक्रमाच्या शुभारंभावेळी पूज्य महेंद्रऋषीजी महाराज, पूज्य पूज्य हितेंद्रऋषीजी महाराज यांनी मांगलिक दिली. याप्रसंगी मर्चंटस बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत, श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, उद्योजक किशोर मुनोत (नेवासकर), आनंदधाम फौंडेशनचे अध्यक्ष राजकुमार चांदमल चोपडा, उपाध्यक्ष भास्कर पवार, सेके्रटरी अभय लुणिया, खजिनदार आनंद चोपडा, अनिल दुगड, प्रितम गांधी, संतोष गांधी, राहुल सोनीमंडलेचा, चेतन मुथियान, नितीन शिंगी, राजू गांधी उपस्थित होते. अभय लुणिया यांनी आभार मानले.

आनंदधाम फौंडेशनने अन्नसेवेच्या कार्याला गत वर्षातील लॉकडाऊनमध्ये सुरुवात केली. लॉकडाऊननंतरही फौंडेशनने हा उपक्रम चालू ठेवला.ही मानवसेवा कौतुकास्पद असून भविष्यातही ती अशीच चालू राहिल असा विश्वास आहे. - संदीप मिटके, डीवायएसपी.

आचार्यश्रींच्या पुण्य स्मृतीला वंदन करून सुरु झालेला हा अन्नसेवेचा उपक्रम खरीखुरी मानवसेवा आहे. या कार्यात सहभागी होणे, योगदान देता येणे ही भाग्याची गोष्ट आहे. अशा उपक्रमातूनच माणुसकीचे नाते घट्ट होण्यास मदत होते. - आनंदराम मुनोत, चेअरमन, मर्चंट बँक

दोन लाख लोकांच्या मुखी घास

आनंदधाम भक्तनिवाससमोर 10 रुपये शुल्क आकारुन रोज सकाळी 11 ते 2 यावेळेत आपुलकी आणि सेवाभाव असलेले जेवण सर्वांना उपलब्ध करून दिले जाते. दररोज दोन वाटी भाजी, तीन चपाती, ठेचा, चटणी तसेच पुलाव, दालखिचडा असे सकस जेवण याठिकाणी दिले जाते. आतापर्यंत दोन लाखाहून अधिक लोकांनी या सेवेचा लाभ घेतला असून भविष्यातही ही अन्नसेवा कायम चालू ठेवणार असल्याचे खजिनदार आनंद चोपडा यांनी सांगितले. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने व साधूसाध्वीजींच्या आशिर्वादानेे प्रारंभ झालेल्या या सेवेसाठी पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभले. याशिवाय जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांच्यासह विविध सामाजिक संस्था, ट्रस्ट, शहरातील दानशूर मंडळींचे सक्रिय योगदान लाभत आहे.