अहमदनगर (प्रतिनिधी) - आगामी महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेनेपैंकी कोणाच्या बाजूने मतदान करायचे की तटस्थ राहायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाणार नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगतील तेच नगरमध्ये भाजपचे नगरसेवक करतील, असे स्पष्ट करतानाच शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी भाजप ‘वेट अॅन्ड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे ‘नगर टाइम्स’शी बोलताना सांगितले.

जूनमध्ये होऊ घातलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत आतापासूनच डावपेच टाकले जात आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीने तयारी सुरू केल्यानंतर काँग्रेसने महापौर पदाच्या निवडणुकीत उडी घेत रंगत भरली आहे. अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असलेल्या महापौर पदासाठी भाजपकडे उमेदवारच नाही. त्यामुळे भाजपची 15 मते मिळवून महापौर पदाचं कोडं सोडविण्याचे गणित मांडले जात आहे. रोहिणी शेंडगे यांच्यासाठी शिवसेनेचा एक गट आणि शीला चव्हाण यांच्यासाठी दीप चव्हाण यांनी भेट घेत भाजपने पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव दिला असल्याचे शहरजिल्हाध्यक्ष गंधे यांनी सांगितले.

मात्र स्थानिक पातळीवर भाजपचा निर्णय होणार नाही. प्रस्तावाची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिली जाईल. ते सांगतील त्यानुसार भाजपचे नगरसेवक भूमिका घेतील. ‘ह्याला की त्याला’ कोणाला, या प्रश्नाच्या उत्तरासाठी काही दिवस वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत पक्ष असल्याचे गंधे म्हणाले.

15ची भूमिका महत्त्वाची!

शिवसेनेतील गटबाजीकडे लक्ष वेधतानाच गंधे यांनी महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या रोहिणी शेंडगे यांच्यासाठी सेनेचे किती नगरसेवक समर्थन देतात याचा भाजप अभ्यास करेल. त्यांच्यासाठी शिवसेनेचा एक गट भेटून गेला. मात्र इतर शिवसेनेचे नगरसेवक त्यांच्या पाठीशी आहेत का? याचा विचार करूनच पक्षश्रेष्ठींना प्रस्ताव पाठविला जाईल. भाजप उगाचच हसू करून घेणार नाही. भाजपकडे महापौर पदाचा उमेदवार नसला तरी महापौर पदाच्या निवडणुकीत 15 नगरसेवक असलेल्या भाजपची भूमिका महत्त्वाची असेल असा दावा गंधे यांनी केला.

काँग्रेस, सेनेच्या इच्छुकांची भेट घेत पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तो प्रस्ताव प्रदेश नेत्यांना कळविला जाईल. त्यानंतर ते सांगतील ती भूमिका भाजपचे नगरसेवक घेतील. तोपर्यंत वेट अॅन्ड वॉच. - भैय्या गंधे, शहरजिल्हाध्यक्ष, भाजप.

भाजपकडे महापौर पदाचा उमेदवार नसला तरी 15 नगरसेवकांच्या संख्येमुळे पक्षाला महत्त्व आहे. इच्छुक भेटून गेले. नगरसेवकांशी चर्चा करून तसे पक्षाच्या नेत्यांना कळवू. त्यानंतर ते निर्णय देतील. त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. - बाबासाहेब वाकळे, महापौर.