आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य विभागाचा अतिरिक्त भार !

मनपा : आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांचे वर्क फ्रॉम होम
आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य विभागाचा अतिरिक्त भार !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात करोनाचा प्रसार रोखण्याची जबाबदारी असलेला मनपा आरोग्य विभागच आजारी पडला आहे. आरोग्य अधिकारी रजेवर असले तरी त्याचा पदभार दुसर्‍याकडे सुपूर्द न करता आयुक्त स्वत:च आरोग्याचा गाडा ओढत आहेत. डॉ. अनिल बोरगे यांच्याकडेच आरोग्य विभागाची जबाबदारी असून त्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची मुभा दिल्याची माहिती आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली.

शहरात करोनाचा हाहाकार झालाय. बेडची संख्या कमी अन् बाधितांची संख्या मोठी अशी परिस्थिती असल्याने नगरकर चिंतेत आहेत. आशा स्थितीत त्यांना आधार देणे, सोबतच उपचाराचे नियोजन करणे हे महापालिकेचे कर्तव्य. आरोग्य विभागच आजारी पडला आहे. आरोग्य विभागप्रमुख डॉ. बोरगे हे आजारी असल्याने रजेवर असल्याचे सांगण्यात आले.

त्यांच्याकडील पद्भार कोणाकडे दिला? असा थेट प्रश्न आयुक्त मायकलवार यांना केला असता त्यांनी शहर स्वच्छतेची जबाबदारी डॉ. नरसिंग पैठणकर यांच्याकडे तर डॉ. बोरगे हेच प्रभारी असून ते ‘वर्क फ्रॉम होम’ करत असल्याचे उत्तर दिले.

त्यानंतर डॉ. बोरगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आजारी असल्याचे सांगत आयुक्तांची ऑर्डरचा दाखला दिला. 7 ऑगस्टला आयुक्त मायकलवार यांनी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या नियोजनाची ऑर्डर काढली आहे.

त्यात उपायुक्त प्रदीप पठारे यांच्याकडे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, रिपोर्टींग, पेशंट शिफ्टींग सेंटरचे काम दिले असून नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पहावे असे म्हटले आहे. खासगी व महापालिकेच्या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल बाधितांची माहिती अपडेटची जबाबदारी संगणक विभागाचे मॅनेजर ए.डी.साळी यांच्याकडे देण्यात आली आहे.

महापालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांना मात्र करोनाच्या जबाबदारीतून सुट्टी देण्यात आली आहे. स्वत: आयुक्त मायकलवार हेच आरोग्याची धुरा सांभाळत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com