झेडपीकडून शैक्षणिक वर्षाचे नियोजन

१३ जूनला शाळेची पहिली घंटा : सीईओ येरेकर यांनी साधला गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संवाद
झेडपीकडून शैक्षणिक वर्षाचे नियोजन
शैक्षणिक धोरण

अहमदनगर (प्रतिनिधी)

येत्या १३ जूनपासून आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्याचे नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केले असून याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधत सूचना दिल्या.

दरम्यान, शाळा सुरू होण्यापूर्वी आणि शाळा सुरू झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती बैठकीत देण्यात आली. यात शाळा सुरू होण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समिती बैठक व शाळा नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या. तसेच दाखलपात्र विद्यार्थ्यांची १०० टक्के पट नोंदणी करावी, पहिल्याच दिवशी नवागतांचे स्वागत करावे. यासह शालेय परिसर व वर्ग स्वच्छता करून घ्यावी, पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तक मोफत गणवेश वितरण करावे. शाळेच्या पहिल्या दिवसापासून दैनंदिन अध्यापनाचे नियोजन असून पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांमार्फत शाळांना नियमित सखोल भेटी होणार आहे.

दरम्यान, शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक दोनचे आयोजन लवकरच करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच प्रत्येक शाळेत प्रथमोपचार पेटीची उपलब्धता व सर्व साहित्य असणे सक्तीचे करण्यात आले असून तक्रार पेटी, तक्रारींची नोंद व त्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे. भाषा, गणित व इंग्रजी पेट्यांचा अध्ययन-अध्यापनात नियमित वापर करावा, शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी यात स्वयंपाकगृहाची स्वच्छता, स्वयंपाकी व मदतनीस यांचे करारनामे, आहार शिजवून देणे, तांदूळ धान्यादी मालाची व्यवस्थित साठवणूक, आवश्यक त्या नोंदी अद्ययावत करणे, चव रजिस्टर ठेवणे, आहाराचा नमुना ठेवणे, आर्थिक अभिलेखे अद्ययावत ठेवण्याच्या सुचना मुख्याध्यापक यांना देण्यात येणार आहे.

येणाऱ्या शैक्षणिक वर्षे २०२२-२०२३ मध्ये प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये दहा टक्के वाढ करणे हे उदृिष्ट साध्य करण्यासाठी प्रभावी संनियंत्रण करणे व शिक्षकांना विद्यार्थी गुणवत्तवाढीच्या अनुषंगाने आवश्यक मदत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी येरेकर यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी विलास साठे, विस्तार अधिकारी जयश्री कराळे यांच्यासह गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com