
अहमदनगर (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील मोठी व मध्यम अशा 9 जलाशयांमध्ये 92 टक्क्यांवर जलसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडावे लागणार की नाही, याची धाकधूक वाढली आहे.
नगर जिल्ह्यात तीन मोठे व सहा मध्यम प्रकल्प असून सध्या या प्रकल्पांमध्ये 46 हजार 557 दलघफु पाणीसाठा आहे. या पाणीसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे. 15 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अवघा 43 टक्के पाऊस झाला होता. 21 दिवस पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली. मात्र 20 सप्टेंबरनंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात 92 टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा व निळवंडे या तीन मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. भंडारदरामध्ये 100 टक्के म्हणजे 11 हजार 39 दलघफु पाणीसाठा आहे. मुळामध्ये 23 हजार 701 म्हणजे 91.16 टक्के साठा तर निळवंडेमध्ये 99.58 टक्के म्हणजे 8 हजार 285 दलघफु पाणीसाठा आहे. मात्र, सहा मध्यम प्रकल्पापैकी मांडओहळ, पारगाव घाटशिळ, खैरी, विसापूर या प्रकल्पामध्ये पाणीसाठी कमी आहे.
उत्तरेतील या तीन धरणांवर समन्यायी पाणी वाटपाची तलवार आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत जायकवाडी धरण 65 टक्के भरले नाही तर त्यानंतर वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याचे आदेश आहेत. त्यानुसार नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी जायकवाडीला सोडावे लागणार आहे. सध्या तरी जायकवाडी 54 टक्के भरले असल्याने किमान 10 टक्के या धरणांमधून पाणी सोडावे लागणार असल्याने नगर व नाशिककर धास्तावले आहेत. याबाबत दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभाग बैठकीत नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांसह जायकवाडीमधील पाण्याची सध्याची स्थिती व पाण्याचा वापर याची माहिती शासनाला देण्याचे सांगण्यात आले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर शासन याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येते.